ममता बॅनर्जी : दिल्ली दौरा यशस्वी झाल्याचा दावा, पवार सोनियांशी चर्चा | पुढारी

ममता बॅनर्जी : दिल्ली दौरा यशस्वी झाल्याचा दावा, पवार सोनियांशी चर्चा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत भेटीगाठी घेतल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाच दिवसांचा दौरा आटोपून शुक्रवारी बंगालला रवाना झाल्या. पंरतु, ममता बॅनर्जींना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रत्यक्षात भेट घेता आली नाही, यामुळे चर्चांना पेव फुटले आहे.

पवारांसोबत चर्चा झाली असून दिल्लीचा दौरा यशस्वी झाल्या आहे, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी बंगालला जाताना व्यक्त केली. कुठल्याही परिस्थितीत देशातील लोकशाही टिकली पाहिजे. त्यामुळे ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ हे आम्हचे घोषवाक्य असल्याचे त्या म्हणाल्या.

ममता यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, काँग्रेस नेते कमलनाथ, आनंद शर्मा, अभिषेक मनु सिंघवी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी यांची भेट घेतली.

गेल्या पाच दिवसांपासून त्या दिल्लीत होत्या. पंरतु, ममता यांची पवारांसोबत प्रत्यक्षात भेट होवू न शकल्याने राजकीय वर्तुळात तर्क-विर्तकांना पेव फुटले आहे. ममता यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पवार त्यामुळे नाराज असल्याचे बोलले जाते. ममतांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान पवारांनी त्यामुळेच अंतर राखल्याची चर्चा रंगली आहे.

नितीन गडकरी-जे.पी.नड्डाची दीर्घकाळ चर्चा

दरम्यान शुक्रवारी संसदेच्या आवारात नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाल्याचे कळते. संसदेत पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून घातला जाणारा गोंधळ तसेच इतर मुद्यावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

संसदेत पेगासस हेरगिरी प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून गोंधळ सुरू आहे. सरकारकडून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी गडकरी आणि नड्डांदरम्यान चर्चा झाल्याचे कळते.

गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार तसेच गुरूवारी ममता यांची भेट घेतली होती.

त्यामुळेच संसदेतील कोंडी फोडण्यासाठी विरोधकांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी गडकरींवर सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी गडकरींनी घेतली पवारांची भेट

दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतली होती.

अनपेक्षित असलेल्या या भेटीदरम्यान संसदेत विरोधकांकडून करण्यात आलेली कोंडी फोडण्यासंबंधी गडकरींनी पवारांसोबत चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरूनच ही भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे ही वाचलं का? 

Back to top button