केजरीवाल यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी आठजणांना अटक | पुढारी

केजरीवाल यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी आठजणांना अटक

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाच्‍या तपासासाटी ६ पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आज दिली. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत काश्मीरी पंडितांची टिंगल उडविल्याचा आरोप करीत भाजप युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी त्‍यांच्‍या घरावर हल्लाबोल केला होता.

आपचे आमदार भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात धाव

केजरीवाल यांच्या घरावर झालेल्‍या हल्ल्यासंदर्भात आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी विशेष तपास समिती नेमण्याची विनंती भारद्वाज यांनी याचिकेत केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या घराचे मुख्य गेट, सुरक्षा बॅरियर, सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचा तसेच घरावर रंग फेकल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता.

केजरीवाल यांचा विरोध सुरुच राहील : तेजस्‍वी सूर्या

काश्मीरी पंडितांची भर विधानसभेत खिल्ली उडविणाऱ्या केजरीवाल यांचा विरोध सुरुच राहील, असे भाजप युवा शाखेचे प्रमुख खा. तेजस्वी सूर्या यांनी सोशल मीडियाद्वारे म्‍हटलं आहे. देशातील हिंदूंचा अपमान करणारे केजरीवाल असामाजिक प्रवृत्तीचे असून हिंदूंचा नरसंहार करणारे दहशतवादी त्यांना प्रिय वाटत असल्याची टीकाही त्‍यांनी केली.

हेही वाचा :

 

Back to top button