बागपत (उत्तर प्रदेश ); पुढारी ऑनलाईन : बागपतच्या बरौत ब्लॉकमधील बरका गावात शिक्षणाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे. यात चक्क उच्च प्राथमिक शाळेचे प्राध्यापक शाळेतच डाराडूर झोपल्याने खळबळ उडाली आहे.
बागपत जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळा बरका येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एकीकडे, उच्च प्राथमिक शाळेचे प्राध्यापक हारुण अली मन्नावार हे चक्क शाळेत डाराडूर झोपलेले असताना दिसत आहेत. तर दुसरीकडे एक प्राध्यापिका वर्ग चालवताना दिसत आहे. याच दरम्यान प्राध्यापक हारुण अली मन्नावार हे व्हायरल झालेल्या एका फोटोत वर्गातील टेबलावर पाय पसरून झोपले असून त्याच्या आजूबाजूला शिक्षकांचा स्टाफदेखील दिसत आहे. यानंतर शाळेत शिक्षक मुंलाना शिकवण्यास येतात की झोपण्यास येतात? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्राध्यापक झोपलेले असून त्यांनी आपल्या पायांतील वाहना एका बाजूला ठेवल्या आहेत. यात स्वयंपाक घरातील माध्यान्ह भोजनाची काही भांडी, शेगडी, टेबल, प्लॅस्टीकची पोती आणि काही रिकामे बॉक्स दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाळेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला आहे.
याआधीही या शाळेची तपासणी करण्यात आली होती तेव्हा प्राध्यापक हारुण अली मन्नावार हे गैरहजर होते. हारुण यांना राज्यपाल पुरस्काराने सम्मानित केले होते. या घटनेचा व्हिडिओ नेमका कोणी बनवला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे बीएसए रघेंद्र सिंह यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?