कर्नाटक : आत्मसन्मानाला लाजला, जीव गमावून बसला ;रोहितच्या मृत्यूस कारणीभूत कोण? | पुढारी

कर्नाटक : आत्मसन्मानाला लाजला, जीव गमावून बसला ;रोहितच्या मृत्यूस कारणीभूत कोण?

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
पेट्रोल पंपावर कामाला असताना पैसे हस्तांतरित करणार्‍या अ‍ॅपमधील त्रुटींचा फायदा उठवत त्याने काही रक्कमेची अफरातफर केली. त्यातून त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला. त्यातील बरीचशी रक्कम पोलिसांनी जप्तही केली. पण गुन्हा उघडकीस आल्यानंतर व्यथित झालेल्या त्या युवकाने स्वतःचे जीवन संपवून टाकले. त्याच्या आत्महत्येस नेमके कारणीभूत कोण? हा प्रश्‍न समोर येत आहे.

नावगे येथील रोहित राजू बेळगुंदकर (वय 21) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. रोहित पूर्वी एका पेट्रोल पंपावर मॅनेजर होता. मालकाचा बिझनेस फोन-पे अ‍ॅप व त्याची मर्चंट आयडी त्याच्याकडे होती. त्या अ‍ॅपमधील सुविधा आणि त्रुटींचा वापर करत रोहितने वर्ष-दिड वर्षात पंपावर तब्बल 44 लाखांची अफरातफर केली. मात्र ही बाब उघडकीस आल्यानंतर पंप मालकाने सीईएन विभागाकडे तक्रार केली. सीईएनने रोहितला अटक करत त्याच्याकडून 28 लाख रूपये जप्तदेखील केले. शिवाय उरलेले पैसे जमा करण्यासाठी तगादा सुरु झाला. रोहितने कथितरित्या केलेल्या अफरातफरीचे समर्थन करता येणार नाही. परंतु, ती सुधारण्यासाठी त्याला वाव देण्याची गरज असताना आणि पोलिसांना एका गुन्हेगाराला पकडल्याचे समाधान मिळाले असले, तरी गुन्हेगाराला सुधारण्याची संधीच मिळाली नाही, असे दिसते.

रोहितने मर्चंट फोन-पेमधील रिफंड ऑप्शनची सुविधा वापरत सुरुवातीला रोज पंपावर जमा होणार्‍या रकमेपैकी 5 ते 15 हजार रुपयांची रक्कम लाटली. अनेक दिवस झाले तरी मालक काहीच विचारत नाही, असे दिसल्यानंतर त्याला वाटले की आपली चोरी खपूून जाईल. परंतु, तो काही सराईत गुन्हेगार नव्हता. त्यामुळे मालकाला पैसे कमी जमा झाल्याचे कळलेच. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी रोहितला चौकशीसाठी बोलावले तेव्हा कसलेही आढेवेढे न घेता रोहितने गुन्हा कबूल केले. शिवाय घरात 28 लाख रूपयांची रोकड असल्याचेही सांगून टाकले. यावरून तो सराईत भामटा नव्हता, हे सिद्ध होते.

रक्कमेचा वापर परिस्थिती सुधारण्यासाठी

रोहितला कसलेही व्यसन नव्हते हे विशेष. फुकटचा पैसा मिळाल्यानंतर अनेकजण व्यसनाच्या आहारी जातात. परंतु, रोहितने त्या पैशातून गावात घर बांधण्यास काढले आणि एक दुचाकी खरेदी केली. तसेच उरलेली रक्कम घरातच ठेवली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर रोहित जेलला गेला आणि तेथेच त्याचे मानसिक खच्चीकरण झाले. आत्मसन्मान गेला, असेच त्याला वाटू लागले. त्यामुळे कारागृहातून आल्यानंतर तो थेट आपल्या नावगे गावी न जाता काही दिवस आपल्या बहिणीकडे राहिला. चार दिवसांपूर्वीच तो नावगेला आला होता.

समाजातूनही टोमणे

आज समाजात असे लोक आहेत की जे चोरी, भ्रष्टाचार व अनेकांची फसवणूक करूनही उजळमाथ्याने फिरतात. हे लोक प्रतिष्ठीत म्हणून त्यांना मानही मिळतो. रोहितवर कायद्याच्या दृष्टीने झालेली कारवाई योग्य होती. मात्र त्यानंतर समाजातूनही तिरस्काराच्या प्रतिक्रिया उमटल्याने रोहितला बहुदा ते सहन झाले नसावे.

व्यक्ती पाहून कारवाई

पोलिसांची भूमिका नेहमीच दुटप्पी व समोरील व्यक्ती पाहून कारवाई होत असते. रोहित अगदी सहज सापडला अन् त्याच्यावर गुन्हा दाखल करून रक्कम तत्परतेने वसूल करून घेतली. हीच तत्परता पोलिस इतर व्यक्तींच्या बाबतीत दाखवताना दिसत नाहीत. उड्डाणाची स्वप्ने दाखवत 40 हून अधिक विद्यार्थ्यांकडून लाखो रूपये वसूल करत फसविणार्‍या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल होऊन सहा महिने झाले तरी त्याच्यावर कारवाई होत नाही. संजय टेंगिनकाईसारखा भामटा बेळगावकरांसह अन्य राज्यातील गुंतवणूकदारांचे तब्बल 200 कोटी रू. घेऊन गेला, तरी तो आता निवांत आहे. अशी शेकडो प्रकरणे सांगता येतील जेथे पोलिस ‘कारवाई सुरू आहे’, इतकेच सांगतात. पोलिसांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले असते, तर उर्वरित 16 लाखांची रक्कमही मिळवून देता आली असती आणि जीवही वाचला असता, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे करता आले असते

रोहितने 44 लाखांची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला. पैकी 28 लाख त्याच्या घरातून जप्त करण्यात आले. उर्वरित रक्कम रोहितने घर बांधकामासाठी खर्च केली होती. हे पाहून मालकाला विश्वासात घेऊन उर्वरित 16 लाखाची रक्कम टप्प्याटप्प्याने परत करण्याचा आणि तसे हमीपत्र पंचांच्या साक्षीने करण्याचा करार करता आला असता. पण तसे न झाल्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर बदनामी झाल्यामुळे रोहितने जीवन संपवले. त्यामुळे त्याच्या मृत्यूला आपल्याला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button