प्रकृती खालावल्याने लालूप्रसाद यादव एम्स रुग्णालयात दाखल | पुढारी

प्रकृती खालावल्याने लालूप्रसाद यादव एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये भरती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लालू प्रसाद यादव रांची जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले होते. परंतु विमानतळावरच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पाच डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे. या आधी लालूप्रसाद यादव मंगळवारी एम्समध्ये आले होते.

परंतु, त्यांना भरती करून घेण्यास रुग्णालय प्रशासनाकडून नकार देत रांचीच्या रिम्स (आरआयएमएस) रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे लालूप्रसाद यादव रांचीला जाण्यासाठी निघाले होते. परंतु, तब्येत बिघडल्याने एम्सच्या परवानगीनेच त्यांना रुग्णालयात भरती करून घेण्यात आले आहे.

लालू प्रसाद यादव यांच्यावर रांचीच्या रिम्समध्ये उपचार सुरू होते. परंतु, त्यांची तब्येत बिघडल्याने एअर अँब्युलन्सद्वारे त्यांना दिल्लीत एम्समध्ये आणण्यात आले. तिथे त्यांना रात्रभर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच रिम्समध्ये त्यांच्यावर उपचार करण्याचा सल्लाही देण्यात आला होता. त्यानंतर लालूप्रसाद यादव रांचीला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले होते. मात्र, विमानतळावरच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा एम्समध्ये भरती करण्यात आले.

पाच वर्षाची शिक्षा, ६० लाखांचा दंड

लालू प्रसाद यादव यांच्यावर बहुचर्चित डोरंडा कोषागारमधून १३९.३५ कोटी रुपये हडपल्याचा आरोप असून या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ६० लाखांपर्यंतचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे त्यांची होटवार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. मात्र, तब्येत बिघडल्याने त्यांना रिम्सच्या पेईंग वॉर्डात भरती करण्यात आले.

हेही वाचलतं का?

Back to top button