देवेंद्र फडणवीस : पीएम मोदी कधीच सुडाचं राजकारण करत नाहीत | पुढारी

देवेंद्र फडणवीस : पीएम मोदी कधीच सुडाचं राजकारण करत नाहीत

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच सूडाचं राजकारण करीत नाहीत. त्यांच्या राज्यात तरी कोणतीही सेंट्रल एजन्सी सूडाच्या भावनेने राजकारण करत नाही. पण प्रविण दरेकरांवर मात्र अशी कारवाई सुरू आहे. नसलेल्या गोष्टी कशा तयार होत आहेत. आमच्या सर्वांविरोधात यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून कसे षड्यंत्र करत आहेत या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टी या नेत्यांनी पाहाव्यात असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तर भाजपने कारवाईचं समर्थन केलं आहे. मात्र, या कारवाईला २४ तास उलटून गेल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कॅमेऱ्यासमोर पहिली प्रतिक्रिया नागपुरात व्यक्त केली.

फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतं केंद्र सरकार असेल अथवा राज्य सरकार असेल, कुणीही चुकीची कारवाई करू नये. कारवाई योग्यच झाली पाहिजे. पुन्हा एकदा विश्वासाने सांगतो, मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होऊच शकत नाहीत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर काल ईडीने कारवाई केली आहे. ईडीने पुष्पक बुलियनमधील पुष्पक ग्रुप कंपनीची ६ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.

निलांबरी प्रकल्पातील या ११ निवासी फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे फ्लॅट्स आहेत. श्रीधर माधव पाटणकर हे या कंपनीचे मालक आहेत.

Back to top button