कर्नाटकात हिंदू मंदिरांच्या परिसरात मुस्लिमांना ‘स्टॉल बंदी’ | पुढारी

कर्नाटकात हिंदू मंदिरांच्या परिसरात मुस्लिमांना ‘स्टॉल बंदी’

बंगळूर : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकात हिजाबच्या वादानंतर धार्मिक तेढ वाढताना दिसत आहे. राज्यातील काही भागात लावलेल्या वादग्रस्त बॅनरमुळे आता एक नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम कर्नाटकच्या भागात काही बॅनर दिसले आहेत, ज्यावर ‘मंदिर परिसरात उभारण्यात येणा-या मुस्लिमांच्या स्टॉल्सना बंदी’, असे लिहिले आहे.

कर्नाटकात उडुपी येथील हिजाब प्रकारणाने अवघ देश ढवळून निघाला. कर्नाटक हायकोर्टाने या संदर्भातील याचिकांवर निकाल देताना हिजाब ही अनिवार्य धार्मिक प्रथा नसल्याचा निकाल दिला होता. या निकालाचा अनेक राजकीय नेते आणि मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. या हिजाब वादानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक मंदिरांनी त्यांच्या वार्षिक उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये केवळ हिंदूंसाठीच स्टॉल लावण्याची परवानगी मर्यादित केली आहे.

अलीकडे, पुत्तूर जिल्ह्यातील महालिंगेश्वर मंदिराने शहरातील वार्षिक जत्रा उत्सवादरम्यान केवळ हिंदूंनाच स्टॉल लावण्याची परवानगी दिली आहे. हा सोहळा १० ते २० एप्रिल दरम्यान शहरात होणार आहे. अशा परिस्थितीत तात्पुरत्या स्टॉलचा लिलाव फक्त हिंदूंपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने १९ मार्च २०२२ रोजी ‘द हिंदू’ या प्रसिद्ध वृत्तपत्रात या संदर्भात नोटीस देखील प्रसिद्ध केली होती.

शिवमोगा आणि उडुपी मंदिरांचा निर्णय

यापूर्वी शिवमोगा येथील कोटे मरीकंबा जत्रेच्या आयोजन समितीने २२ मार्चपासून सुरू झालेल्या ५ दिवसीय उत्सवात केवळ हिंदू दुकानदारांना त्यांची दुकाने लावण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे कर्नाटकातील उडुपी येथील होसा मरीगुडी मंदिरानेही वार्षिक जत्रेत फक्त हिंदू विक्रेत्यांना स्टॉल लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिसरातील हिजाबच्या वादानंतर मंदिर प्रशासनाने वार्षिक ‘सुग्गी मारी पूजा’ कार्यक्रमावेळी केवळ हिंदूच लोकं दुकाने लावतील असा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

महालिंगेश्वर मंदिर प्रशासनाची नोटीस..

शिवमोगा आणि उडुपीप्रमाणेच पुत्तूर जिल्ह्यातील महालिंगेश्वर मंदिरानेही हा मार्ग स्वीकारला आहे. एप्रिलमध्ये होणार्‍या धार्मिक उत्सवात फक्त हिंदू विक्रेत्यांना सहभागी होण्याची परवानगी आहे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. जत्रेदरम्यान २९ मे रोजी मंदिरासमोर पूजा होणार असून मंदिर कार्यालयाने दिलेल्या जागेवर मोजक्याच दुकानदारांना दुकान थाटण्याची परवानगी दिली जाणार आहे.

दुसरीकडे, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बाप्पानाडू श्री दुर्गापरमेश्वरी मंदिराच्या वार्षिक उत्सवात आणखी एका होर्डिंगमध्ये असे म्हटले आहे की, “जे लोक कायद्याचा किंवा जमिनीचा आदर करत नाहीत आणि जे एकतेच्या विरोधात आहेत त्यांना मंदीर परिसरात व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आम्ही त्यांना व्यवसाय करू देणार नाही. हिंदू जागरूक आहेत.”

शिवमोगा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची झाली होती हत्या

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या हिजाब वादात हर्षा नावाच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची काही कट्टरवाद्यांनी हत्या केल्याचे समोर आले होते. या प्रकारानंतर मुस्लीम दुकानदारांना तेथे होणाऱ्या मरीकंबा उत्सवापासून दूर ठेवण्यात आले. मंदिर समितीचे अध्यक्ष एसके मरियप्पा यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, भूतकाळातील परिस्थिती कधीही सांप्रदायिक नव्हती, परंतु अलीकडील घडामोडी आणि सोशल मीडियावर सुरू केलेल्या मोहिमांमुळे हा निर्णय घेण्यात आला.

हिजाबचा वाद…

हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. इस्लाममध्ये हिजाब परिधान करणे सक्तीचे नाही, त्यामुळे शाळेत ड्रेस कोड पाळावा लागेल, असे हायकोर्टाने निकालात म्हटले होते. या निर्णयानंतर, राज्यातील काही मुस्लिम संघटनांनी निषेध करण्यासाठी बंदची घोषणा केली होती. त्यानंतर या निषेधाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांनीही कठोर भूमिका घेत त्यांच्या वार्षिक उत्सवात केवळ हिंदूंना स्टॉल लावण्याची परवानगी देण्यचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.

 

Back to top button