चीनमध्ये Corona पुन्हा आलाय, सतर्क रहा! केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्य, केंद्रशासित प्रदेशांना पत्र | पुढारी

चीनमध्ये Corona पुन्हा आलाय, सतर्क रहा! केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्य, केंद्रशासित प्रदेशांना पत्र

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

चीन, दक्षिण पुर्व आशियासह यूरोप मधील काही देशांमध्ये कोरोना (Corona)  महारोगराईने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अशात केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव तसेच आरोग्य सचिवांना पत्र पाठवून कोरोना स्थितीसंबंधी सतर्क केले आहे.

कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या चिंताजनक नाही, हे लक्षात घेत कुठलेही राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांतील शासक-प्रशासनकांनी निष्काळजीपणा करू नये. सतर्कता बाळगून कोरोना तपासण्या, रुग्णांचे ट्रेसिंग, उपचार, लसीकरण तसेच कोरोना नियमाचे पालन योग्यरित्या केले जाईल, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची सूचना भूषण यांनी पत्रातून दिली आहे.

योग्य प्रमाणात कोरोना (Corona)  तपासण्या करण्याचे निर्देशदेखील केंद्राकडून देण्यात आले आहेत. कोरोना तपासण्याचे प्रमाण योग्य प्रमाणात ठेवले तर संसर्गाच्या नवीन व्हेरियंटचा शोध घेता येईल, असे भूषण यांनी सूचवले आहे. संपूर्ण दक्षिण-पुर्व आशिया तसेच यूरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट आली आहे. याच कारणाने आरोग्य मंत्र्यांनी १६ मार्चला एक उच्च स्तरीय बैठक घेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जिनोम सिक्वेंसिंगवर काम करण्याचे निर्देश दिले होते.

राज्य सरकारांनी नागरिकांना लसीकरणासाठी प्रेरित केले पाहिजे. सोबत नागरिकांनी मास्क घालावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये तसेच भैतिक दुरत्व बाळगावे, स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासारख्या सूचना देखील केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.

देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७३ टक्क्यांवर! २४ तासांत २ हजार ५२८ रुग्ण

देशात गुरूवारी दिवसभरात २ हजार ५२८ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, १४९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान ३ हजार ९९७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७३ टक्के नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.४० टक्के नोंदवण्यात आला. देशाातील एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या २९ हजार १८१ (०.०७ टक्के) पर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ५८ लाख ५४३ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर,५ लाख १६ हजार २८१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८० कोटी ९७ लाख ९४ हजार ५८८ डोस लावण्यात आले आहेत. तर, १२ ते १४ वयोगटातील ९ लाख बालकांचे आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. खबरदारी म्हणनू आतापर्यंत २ कोटी १६ लाख ३१ हजार १९६ बूस्टर डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८३ कोटी २७ लाख २५ हजार ६० कोरोना डोस पैकी १७ कोटी २२ लाख २५ हजार १९६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Back to top button