राहुल गांधी यांची भुपिंदरसिंग हुडा यांच्याशी खलबते | पुढारी

राहुल गांधी यांची भुपिंदरसिंग हुडा यांच्याशी खलबते

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीत पाच राज्यांत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. यामूळे असंतुष्ट नेत्यांची गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या पार्श्वभूमीवर बैठकीस हजर असलेले हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुडा यांच्याशी राहुल गांधी यांनी बैठकीनंतर काही खलबते केली. हुडा हे हरियाणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.

तसेच, असंतुष्ट नेत्यांच्या समूहाला जी -23 असेही संबोधले जाते. जी – 23 च्या बैठकीत काँग्रेसच्या पराभावावर चर्चा झाली होती. या समूहात गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, शशी थरूर, राज बब्बर, संदीप दीक्षित आदी नेत्यांचा समावेश आहे. संघटनात्मक बदल झाल्याशिवाय पक्षात नवचैतन्य येणे शक्य नसल्याचा निष्कर्ष बैठकीत काढण्यात आला होता. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर भुपिंदरसिंग हुडा हे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी गेले. राहुल गांधी यांनी दिलेल्या सल्ल्यांची माहिती त्यांनी जी -23 समुहाला दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, जी – 23 समूहाने तयार केलेले प्रस्ताव घेऊन लवकरच गुलाम नबी आझाद काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारच्या जी -23 च्या बैठकीचा उद्देश त्यांनी त्याच दिवशी सोनिया गांधी यांना कळविला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर पक्षात एकच खळबळ होती. पराभवानंतर झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी आपल्या राजीनामा देऊ केला होता, मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी तो प्रस्ताव फेटाळला.

हेही वाचा 

Back to top button