सांगली : विट्यातील ‘ऐतिहासिक सेंट्रल स्कूल’ चे भाग्य पालटले | पुढारी

सांगली : विट्यातील 'ऐतिहासिक सेंट्रल स्कूल' चे भाग्य पालटले

विटा : पुढारी वृत्तसेवा : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण ज्या ठिकाणी वावरले होते. माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले, प्राचार्य डॉ. शिवाजी भोसले शिकले होते. तर मराठी साहित्यातील ग्रामीण जीवनाचे भाष्यकार श्री. म. माटे ज्या शाळेत शिक्षक होते. विट्यातील त्या ऐतिहासिक सेंट्रल स्कूल नावाच्या वास्तूचे तब्बल एक कोटींहून अधिक रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले आहे.

पूर्वाश्रमीच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातील आणि आताच्या सांगली जिल्ह्यातील विटा शहरातील सेंट्रल स्कूल. या सेंट्रल स्कूलमध्ये देश-विदेशातील अनेक ख्यातनाम विद्यार्थी घडले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, शिक्षण, कला-क्रीडा अशा विविध प्रकारात अनेक दिग्गज या शाळेत घडले आहेत. या शाळेची इमारत विजापूर ते गुहागर राज्यमहामार्गावर विटा शहराच्या ऐन मध्यवर्ती ठिकाणी आहे. एकूण १५००चौरस मीटर जागेमधील या इमारतीसाठी खासफाडीचा दगड वापरलेला आहे. जाड भिंती, कमानीच्या आकाराच्या चौकटी आणि खिडक्या, सागवानी लाकूड या ठिकाणी वापरला गेल्या आहेत.

खानापूर पंचायत समितीच्या वतीने मूळ ढाच्यात बदल न करता या ठिकाणी सुसज्ज ग्रंथालय, ई-लायब्ररी तसेच अभ्यासिका तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांच्या जीवनावरील सर्व पुस्तके एकाच छताखाली ठेवण्यात येणार आहेत. या अभ्यासिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, एकूण पुस्तके, ई लायब्ररी आणि संगणक वगैरे गोष्टी मिळून सव्वा कोटी रुपयांहून अधिक खर्च केला गेला आहे. अशा प्रकारचा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात एकमेव असेल, असा दावा सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केला आहे.

यावेळी सुहास बाबर म्हणाले, पंचायत राज व्यवस्थेत काम करीत असताना खानापूर पंचायत समितीचा उपसभापती आणि जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून दोन्हीचा राज्यात प्रथम क्रमांक आला. आता राज्यात माईल स्टोन ठरेल, असे काम करायचा आपला मानस आहे. त्यासाठी अनेक तज्ञ लोकांशी चर्चा करून या ठिकाणी अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेतला. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील सर्व पुस्तकांचा संग्रह करून त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी दालन तयार करणार आहे. या ठिकाणी तीस लोकांच्या अभ्यासाची सोय करण्यात आली आहे.

या ठिकाणी एकूण पंचवीस हजारपेक्षा जास्त पुस्तके, संदर्भ ग्रंथ, स्पर्धा परिक्षा पुस्तके शिवाय विश्वकोश, संस्कृती कोश, भाषाकोशांचे सर्व खंड उपलब्ध करून देणार आहोत. याशिवाय या इमारतीच्या समोरील जागेत एक उत्कृष्ट सभागृह देखील उभारणार आहे, असेही बाबर यांनी सांगितले.

यावेळी माजी सभापती महावीर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निलम सकटे, सुलभा आदाटे, अभिजित पवार, प्रकाश बागल, नंदू सकटे, भारत पवार, प्रसाद लिपारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button