पेट्रोल-डिझेल दर कमी होणार?; रशियाकडून स्वस्तात खरेदी केलं ३० लाख बॅरल कच्चं तेल | पुढारी

पेट्रोल-डिझेल दर कमी होणार?; रशियाकडून स्वस्तात खरेदी केलं ३० लाख बॅरल कच्चं तेल

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

रशियाने ऑफर केलेल्या सवलतीच्या दरात भारतीय तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने ३० लाख बॅरल (3 million barrels) कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. रशियाकडून अद्याप युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. याच दरम्यान, भारतातील मोठ्या तेल कंपनीने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली आहे. IOC ने मे डिलिव्हरीसाठी कच्चे तेल प्रति बॅरल २०-२५ डॉलरच्या सवलतीने खरेदी केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यामुळे, रशियाने भारत आणि इतर मोठ्या खरेदीदार देशांना सवलतीच्या दरात तेल आणि इतर वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. भारत हा मोठा तेल आयातदार देश असून एकूण देशांतर्गत गरजेच्या ८५ टक्के तेलाची आयात केली जाते. तेलाची गरज लक्षात घेता भारत स्वस्त दरात कुठूनही तेलाची खरेदी करून ऊर्जा बिलात कपात करू पाहत आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले होते की, विमा आणि मालवाहतूक यासारख्या बाबींचा विचार करून रशियाकडून कच्च्या तेलाची सवलतीच्या दरात खरेदी करण्याचा विचार केला जात आहे.

रशियाने युक्रेनवर युद्ध लादल्याने अमेरिकेसह मित्रराष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. मात्र, भारत याबाबत तटस्थ असून, रशियाच्या जुन्या मैत्रीशी बांधील आहे. त्यामुळे रशियाकडून कच्च्या तेलाचा व्यवहार केला आहे. जगाने रशियावर निर्बंध लादले असताना भारताने रशियाकडून कच्चे तेल घेतल्यास त्याची किंमत भारताला मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

भारत जे ८० टक्के तेल आयात करते, त्यातील सुमारे २ ते ३ टक्के तेलाचा पुरवठा रशियाकडून होतो. पण आता रशियाकडून तेल खरेदी वाढणार असल्याचे संकत मिळत आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकार तेल आयातीवर होणारा खर्च कमी करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल तसेच अन्य वस्तू खरेदी करण्यावर भर देत आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात | Russia- Ukraine War

Back to top button