Punjab Election 2022 Update : या ५ कारणांनी पंजाबमध्ये ‘आप’नं मारलं मैदान | पुढारी

Punjab Election 2022 Update : या ५ कारणांनी पंजाबमध्ये 'आप'नं मारलं मैदान

पुढारी ऑनलाईन डेस्क 

उत्तर प्रदेश , उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांबरोबरचं पंजाबमध्येही आज (१० मार्च, २०२२) मतमोजणी झाली. सर्वत्र चुरसीचे वातावरण होते. (Election 2022 Update)  पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार आपने २५ जागांवर विजय मिळवला आहे. तर ६६ जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. पंजाबच्या जनतेने ‘आप’ ला का  पसंती का दिली याची पाच कारणे आपण थोडक्यात समजुन घेवूया. (Punjab Election)

निकालाच्या सुरूवातीपासूनच आपने बहुतांश जागांवर विजयी आघाडी घेतली. बेरोजगारी, अमली पदार्थाला विरोध, भ्रष्टाचार मुक्त सरकार यासारखे विषय घेवून आपने पंजाब जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत पंजाबमध्ये आपने ‘दिल्ली मॉडेल’ पंजाबमध्येही आणलं. पंजाबमध्ये आतापर्यंतच्या राजकीय सत्ता पाहिल्या असता लक्षात येईल कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचे वर्चस्व राहिले आहे. पण यावेळची परिस्थिती थोडी वेगळी होती.

Punjab Election : पंजाबमध्ये ‘आप’ येण्याची ‘पाच’ कारणे 

सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजीची लाट

पंजाबमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोेधात नाराजीचा सूर होता.  २०१७ मध्ये कॉंग्रेसने शिरोमणी अकाली दलाला विरोध करत घराघरात नोकरी देणार अशी घोषणा केली होती. पण कॉंग्रेसने याची पुर्तता केली नाही. २०२१ मध्ये पंजाबचा बेरोजगारीचा दर ७.८५ टक्क्यांवर पोहोचला. वाढलेली बेरोजगारी, अमलीपदार्थाचा विळखा यावर उपाय निघाला नाही. याचा कॉंग्रेसला फटका बसला.

कॉंग्रेसचा अंतर्गत वाद

पंजाबमधील कॉंग्रेसचा अंतर्गत वाद हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. पंजाब कॉंग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंह सिद्धू, विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि सुनील जाखड यांच्यातील अंतर्गत वादाने कॉंग्रेसची प्रतिमा मलिन झाली होती.

दिल्ली मॉडेल

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये ‘दिल्ली मॉडेल’ आणून मतदारांचे लक्ष वेधून घेतले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ३ जागा जिंकून आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये एंट्री केली होती. तेव्हापासून आप हा  शिरोमणी अकाली दल व कॉंग्रेस यांचा तगडा प्रतिस्पर्धी मानला जावू लागला होता.

आपचा जाहीरनामा

आपच्या  १० सुत्री जाहीरनाम्यातील मुद्द्यांनी पंजाब जनतेचे लक्ष वेधून घेतेले होते. बेरोजगारी, अमली सेवनाला विरोध, भ्रष्टाचाराला विरोध, सरकारी शाळा आणि हॉस्पिटलमधील सुधारणा करु, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन करू हे मुद्दे घेवून जनमत अनुकुल करण्यास सुरुवात केली. आपने पंजाबमध्येही तेथील समस्या लक्षात घेवून त्यानुसार जाहीरनामा जाहीर केला आणि लोकांचा विश्वास संपादन केला.

शेतकऱ्यांबरोबर आप

केंद्रातील सरकारच्या तीन कृषी कायद्यांना पंजाब  शेतकऱ्यांनी विरोध केला. हा मुद्दा घेवून आप शेतकऱ्यांच्याबरोबर राहिले. आप नेते आंदोलनाच्या ठिकाणी जावून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधायचे.

Back to top button