भटक्या कुत्र्यांना लोकांनी खाऊ घालणे योग्य की अयोग्य ? फैसला आता सर्वोच्च न्यायालय करणार !

भटक्या कुत्र्यांना लोकांनी खाऊ घालणे योग्य की अयोग्य ? फैसला आता सर्वोच्च न्यायालय करणार !

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : रस्त्यांवरून भटकणार्‍या बेवारस कुत्र्यांना खाऊ घालणे योग्य आहे की नाही, याचा फैसला आता सर्वोच्च न्यायालय करणार आहे. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याचा अधिकार नागरिकांना बहाल करणारा निकाल दिल्‍ली उच्च न्यायालयाने दिला आणि त्यास एका स्वयंसेवी संघटनेने (एनजीओ) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

24 जून 2021 रोजी दिल्‍ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध ह्यूमन फाउंडेशन फॉर पीपल अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल्स या एनजीओने दाखल केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाचे न्या. विनीत सरण आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने दखल घेतली.आणखी सहा आठवड्यांनी सुनावणी निश्‍चित करतानाच प्राणी कल्याण मंडळ, दिल्‍ली सरकार आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेशही खंडपीठाने दिले.

काय आहे याचिका ?

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर बनू शकतो, असे एनजीओने आव्हान याचिकेत म्हटले आहे. माणसाच्या देखरेखीखालील आणि नियंत्रणातील कुत्री पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतात. त्यांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता त्यांना पाळणारा करत असतो. इतरांवर हल्‍ले करण्यापासून, चावा घेण्यापासून अशा कुत्र्यांना रोखले जाऊ शकते. त्यांना प्रशिक्षणही देता येते. परंतु भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत तसे नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावर खाद्य पुरविणे ही नागरिकांसाठी जोखीम ठरू शकते, असेही या याचिकेत म्हटले आहे.

हायकोर्टाने दिले कुत्र्यांनाही अधिकार

भटक्या कुत्र्यांना अन्‍न खाण्याचा आणि त्यांना अन्‍न भरविण्याचा अधिकार नागरिकांना आहे. हा अधिकार बजावताना इतरांना त्रास होणार नाही, याचीही काळजी सर्वांनी घ्यावी. भटक्या कुत्र्यांना त्यांच्या परिसरात जाऊन अन्‍न देता येईल.

ज्या व्यक्‍तीला भटक्या कुत्र्यांबद्दल सहानुभूती आहे, तो त्यांना आपल्या घराजवळ किंवा घराच्या रस्त्यावर कुत्र्यांना अन्‍न देऊ शकतो. भटके कुत्रे उंदिर, घुशी यांसारख्या प्राण्यांना खाऊन स्वच्छतादूताचे काम करतात. त्यामुळे रोगप्रसारास प्रतिबंध होतो, असे उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लोक का जातात, असा प्रश्‍न ज्यांना पडेल त्यांनी या भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद महाराष्ट्रासह देशभर कसा आहे याचा अभ्यास करावा अशी गंभीर स्थिती आहे. त्यातील ही काही प्रातिनिधिक पण अधिकृत सरकारी आकडेवारी.

  • कल्याण-डोंबिवलीत एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत 10 हजार 926 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांची सरकार दप्तरी नोंद घेण्यात आली आहे. दिवसाला सरासरी 36 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला.
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने रॅबिजवरील इंजेक्शनसाठी जानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळात 66 लाख 41 हजार रुपये खर्च केले.
  • शिवाय कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी खासगी ठेकेदाराला वर्षाला अंदाजे 70 लाख रुपये अदा करण्यात येतात. तर प्रत्येक कुत्र्यामागे 840 रुपये देण्यात येतात.
  • ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षभरात 2 हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेने केली आहे. प्रत्यक्षात ही संख्या 3 ते 4 हजारांच्या घरात असल्याचा दावा सामाजिक संस्थांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांत कुत्र्यांची नसबंदीदेखील बंद असल्याने कुत्र्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ठाणे शहरात आजच्या घडीला 80 हजार ते 1 लाख भटक्या कुत्र्यांची संख्या आहे.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news