माधुरी दीक्षित हिला तिचा ‘इंग्लिश विंग्लिश’ कधी मिळणार? | पुढारी

माधुरी दीक्षित हिला तिचा ‘इंग्लिश विंग्लिश’ कधी मिळणार?

‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘द फेम गेम’ या वेबसिरीजमध्ये एक प्रसंग आहे. अनामिका आनंद (माधुरी दीक्षित) आणि तिचा नवरा निखिल (संजय कपूर) अनामिकाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलत असतात. निखिल अनामिकाला बोलतो की, ‘सगळेजण तुझ्या पुनरागमनाची आतुरतेने वाट बघत आहेत.’

त्यावर अनामिका म्हणते, ‘पुनरागमन करायला मी गेले कुठं होते? इथंच तर आहे मी.’ यावर तिचा नवरा म्हणतो, ‘अगं, मी कुठं काय म्हणतोय? हा फिल्म इंडस्ट्रीने दिलेला टॅग आहे.’ यावर अनामिका वैतागून म्हणते, ‘आणि तुम्ही लोक मला सतत याची आठवण करून देत जा.’ हा प्रसंग अनामिकाची भूमिका केलेल्या माधुरी दीक्षितच्या खर्‍या आयुष्यातपण घडला असावा इतका चपखल आहे. 2007 ला माधुरी दीक्षितने ‘आजा नच ले’ सिनेमातून काही वर्षांच्या कालखंडानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं, तेव्हा लोकांमध्ये आणि माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली होती.

नंतर माधुरीने ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटामधून मराठीमध्ये पदार्पण केलं, तेव्हापण आपण हरखून गेलो. आणि आता ‘द फेम गेम’मधून माधुरी दीक्षितने ओटीटीवर पदार्पण केलं, तेव्हापण अशाच चर्चा होत आहेत. माधुरी दीक्षित नावाच्या सुपरस्टारचं गारुड लोकांच्या मनातून उतरायला तयारच नाहीये. पण, माधुरी दीक्षितवर हिरिरीने चर्चा करणारे, ‘लुपवर’ माधुरीचे जुने गाणे आणि सिनेमे बघणारे लोक ‘आजा नच ले’ आणि ‘बकेट लिस्ट’ बघायला थिएटरमध्ये का गेले नाहीत? असाही प्रश्न पडतो. कारकिर्दीच्या सेकंड इनिंग्जमध्ये माधुरीच्या कलाकृतींना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसलाच नाही. ‘द फेम गेम’ हे अस्वस्थ करणारं वास्तव बदलू शकेल का?

माधुरी दीक्षित तिच्या एन उमेदीच्या काळात किती मोठी स्टार होती, हे कदाचित सध्याच्या तरुण प्रेक्षक वर्गाला माहीत असण्याची शक्यता नाही. 1991 ते 1997 या कालखंडात माधुरी दीक्षितचं बॉक्स ऑफिसवर एकछत्री राज्य होतं. माधुरीच्या नावावर प्रेक्षक सिनेमा बघायला यायचे आणि माधुरीच्याच नावावर सिनेमाला ओपनिंग मिळायची. आज देशातले सगळ्यात मोठे स्टार असणारे आमीर, शाहरूख, सलमान, अक्षयकुमार हे माधुरीच्या अफाट स्टारडमसमोर बुजलेले वाटायचे. माधुरीसमोर उभा राहील, असा कुठलाही मोठा पुरुष-स्टारच इंडस्ट्रीमध्ये नव्हता. सनी देओल, संजय दत्त, गोविंदा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ या सहकलाकारांपेक्षा माधुरी फार उत्तुंग वाटायला लागली होती. तिच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू शकेल, असा अमिताभ बच्चन फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेर होता.

‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘राजा’सारखे सिनेमे माधुरीच्या नावावर तडाखेबंद चालले होते. माधुरी म्हणजे बॉलीवूडमधली शेवटची महिला सुपरस्टार. जिथं ‘स्टार्स’भोवतीचं गूढ वलय झपाट्याने विरत चाललंय, अशा सोशल मीडियाच्या काळात आता नवीन सुपरस्टार बनण्याची प्रक्रिया जवळपास थांबली आहे. दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट यांना त्यांच्या गुणवत्तेचं, यशाचं क्रेडिट देऊनपण असं म्हणावं लागतं की, आता नवीन माधुरी दीक्षित होणे नाही. पण एवढी झळाळती कारकिर्द असूनपण माधुरीच्या कारकिर्दीला एक काळपट किनार होतीच. स्वतःमधल्या अभिनेत्रीला आव्हान देऊ शकतील, अशा भूमिका माधुरीच्या फारशा दिसत नाहीत. तिच्या बहुतेक भूमिका मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या सिनेमात, ए लिस्टर सहकलाकारांसोबतच होत्या.  त्यात अभिनयविषयक प्रयोगांना फारसा वाव नव्हता.

एखादाच नियम सिद्ध करणारा ‘मृत्युदंड’ किंवा ‘प्रहार’सारखा अपवाद. पण तो काळच तसा होता. नव्वदच्या शतकात प्रायोगिक सिनेमे फारसे बनत नव्हतेच. त्या वातावरणात माधुरीला वेगळे प्रयोग करण्याची संधी फारशी नव्हतीच. 2001 नंतर जेव्हा बॉलीवूडमध्ये ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ नंतर बॉलीवूडमध्ये नवीन प्रयोग करणारे सिनेमे बनू लागले, तेव्हा माधुरीच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ संपला होता. क्षितिजावर राणी मुखर्जी आणि प्रीती झिंटा यासारख्या नवीन तारकांचा उदय होऊ लागला होता. ‘देवदास’ हा माधुरीचा शेवटचा मोठा प्रोजेक्ट. मग लग्न करून माधुरी सगळ्या लाईमलाईटपासून दूर अमेरिकेलाच निघून गेली. माधुरी दीक्षितबद्दल अजूनही एका प्रेक्षकवर्गात (विशेषतः आता तिशी आणि चाळीशीत असणार्‍या) अजूनही उत्सुकता का आहे, याची ही पार्श्वभूमी.

माधुरी दीक्षितच्या सेकंड इनिंगला तिच्या पहिल्या इनिंग्जइतकं यश का मिळालं नाही, याची काही कारणं आहेत. याचा दोष काही प्रमाणात प्रेक्षक आणि फिल्म इंडस्ट्रीच्या काही पूर्वग्रहांकडेपण जातो. भारतीय पुरुष प्रेक्षक पडद्यावरच्या खलनायकाला ठोकणार्‍या ‘अँग्री यंग मॅन’मध्ये जसं स्वतःला बघतो, तसं पडद्यावर आदर्श स्त्री असणार्‍या नायिकेमध्ये स्वतःच्या प्रेयसीला (खर्‍या किंवा काल्पनिकपण)पण बघत असतो. असा प्रेक्षक लग्न झालेल्या नायिकांमध्ये स्वतःच्या प्रेयसीला बघू शकत नाही, असं फिल्म इंडस्ट्री दिग्गज वर्षानुवर्षे मानत आलेत. तिन्ही खान आणि अक्षयकुमार हे आजही नायक म्हणून विशीतल्या नायिकांशी पडद्यावर रोमान्स करत आहेत, पण त्यांच्यासोबत काम केलेल्या नव्वदच्या दशकातल्या नायिका आणि 2000 च्या सुरुवातीच्या दशकातल्या बहुतेक नायिका कधीच पडद्याआड गेल्या आहेत.

नायिकांची सरासरी अल्पजीवी कारकिर्द आणि नायकांची सरासरी कारकिर्द यातली विषमता भयाण आहे. मग या विषमतेला माधुरी दीक्षितपण अपवाद नाहीये. गेल्या काही वर्षांमध्ये करिना कपूर आणि ऐश्वर्या रायसारख्या अभिनेत्री हा नियम हिरिरीने खोटा ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अजूनही लग्न झालेल्या अभिनेत्रींना या पुरुषी व्यवस्थेने लादलेल्या विषमतेला तोंड द्यावं लागतं. दुसरं म्हणजे प्रेक्षकांची बदलती डेमोग्राफी. 2000 सालानंतर जन्म झालेल्या विशीतल्या एका मोठ्या पिढीला माधुरी दीक्षित काय आहे, हे माहीत असण्याची शक्यता कमी आहे. आपल्या वडिलांच्या पिढीची लाडकी नायिका एवढंच त्यांना माधुरीबद्दल माहीत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा तरुण वर्ग माधुरीच्या नवीन सिनेमांपासून दूर राहिला असावा. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे माधुरी दीक्षित निवडत असलेले प्रोजेक्टस्. माधुरीच्या कमबॅकनंतर ‘डेढ ईश्कीया’ आणि काही प्रमाणात ‘गुलाब गँग’चा अपवाद वगळता माधुरीने निवडलेले प्रोजेक्ट फारसे वेगळं असं काही करणारे नव्हते.

पहिल्या इनिंग्जप्रमाणेच माधुरी दुसर्‍या इनिंग्जमध्येपण मोठ्या बॅनर्सवर अवलंबून आहे. तिचे बहुतांश प्रोजेक्ट एक तर आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्ससोबत आहेत, नाहीत तर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्ससोबत आहेत. हे प्रस्थापित बॅनर अपवाद वगळता स्टोरीटेलिंगमध्ये वेगळे प्रयोग करण्याच्या फंदात पडत नाहीत. शिवाय, माधुरीसोबत काम करणारे लेखक-दिग्दर्शक-निर्माते हे अजूनही नव्वदच्या दशकातल्याच माधुरी दीक्षितच्या प्रतिमेच्या प्रेमात आहेत, असं जाणवतं. खरं तर माधुरीने या प्रस्थापित बॅनर्स, दिग्दर्शकांच्या मांदियाळीतून बाहेर पडून नवीन दमाच्या लेखक-दिग्दर्शकांसोबत काम करणं गरजेचं आहे. माधुरीमधल्या स्टारपेक्षा माधुरीमधल्या अभिनेत्रीला वाव हे नवीन दमाचेच लेखक-दिग्दर्शक देऊ शकतात.

पण यासाठी माधुरीला स्वतःच्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडावं लागेल. जे अमिताभ बच्चनने त्याच्या सेकंड इनिंग्जमध्ये केलं होतं. नागराज मंजुळेसारख्या नवीन दमदार दिग्दर्शकालापण आजही अमिताभ बच्चनसोबत काम करावंसं वाटतं यातच बच्चनचं यश आहे. पण यासाठी तुम्हाला ‘रिबूट’ करून स्वतःला ‘अपडेट’ ठेवावं लागतं. माधुरी दीक्षित हे कसं करेल यावर तिच्या दुसर्‍या इनिंग्जचं यश अवलंबून राहील.

माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी या दोन्ही दिग्गज अभिनेत्री. पुरुषप्रधान फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा ठसा उमटवणार्‍या दोन महानायिका. श्रीदेवीला हटवूनच माधुरी नंबर वनच्या क्रमांकावर आरूढ झाली. पण श्रीदेवीला तिच्या सेकंड इनिंग्जमध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’सारखा एक उत्तम सिनेमा मिळाला. एका उच्च मध्यमवर्गीय घराण्यातल्या गृहिणीला इंग्रजी येत नसल्यामुळे अनेक पातळ्यांवर जे संघर्ष करावे लागतात, त्याची अतिशय हृद्य गोष्ट या सिनेमात होती.

या सिनेमाची दिग्दर्शिका गौरी शिंदे फिल्ममेकिंगमध्ये नवीन असूनपण फक्त कथेकडे बघून श्रीदेवीने हा सिनेमा केला. हा सिनेमा श्रीदेवीच्या सेकंड इनिंग्जमधलाच नाही, तर तिच्या एकूणच समृद्ध असणार्‍या कारकिर्दीमधल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. माधुरी दीक्षितला अजून तिचा ‘इंग्लिश विंग्लिश’ गवसायचा आहे. तसा तो तिला लवकर गवसो. त्याशिवाय एक चक्र पूर्ण होणार नाही. कारण हॅप्पी एंडिंगवर हजारो-लाखो लोकांचा विश्वास माधुरीच्या सिनेमांमुळेच तर बसलाय! कारकिर्दीच्या सेकंड इनिंग्जमध्ये माधुरीच्या कलाकृतींना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसलाच नाही. त्यामागं काही कारणं आहेत. अर्थात, याचा दोष काही प्रमाणात प्रेक्षक आणि फिल्म इंडस्ट्रीच्या काही पूर्वग्रहांकडेपण जातो.

अमोल उदगीरकर

Back to top button