कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरण्याच्या मार्गावर! पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यावर | पुढारी

कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरण्याच्या मार्गावर! पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरण्याच्या मार्गावर आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११ हजार ४९९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २५५ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २३ हजार ५९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशातील एकूण ४ कोटी २२ लाख ७० हजार ४८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १ लाख २१ हजार ८८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दैनंदिन संसर्ग दर १.०१ टक्क्यावर आला आहे. आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे १७७ कोटी १७ लाख ६८ हजार ३७९ डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशातील ५ लाख १३ हजार ४८१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

याआधी गुरूवारी दिवसभरात १३ हजार १६६ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर, ३०२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान २६ हजार ९८८ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.४९ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर १.२८ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर १.४८ टक्के नोंदवण्यात आला होता.

कोरोनासंबंधी निर्बंध शिथिल करा!

देशात कोरोना महारोगराई जवळपास आटोक्यात आली आहे. अशात केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध आणखी शिथिल करण्याचे निर्देश राज्य, केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील अर्थकारणांशी संबंधित गतीविधींना सवलती दिल्या जावू शकतात,असे मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आलेल्या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाला परवानगी देण्यासह नाईट कर्फ्यू चा अवधी कमी करण्याचा सल्ला पत्रातून देण्यात आला आहे.

आर्थिक गतीविधींना सुरू करण्याचा निर्णय संपूर्ण स्थितीचा आढावा घेतल्यानंतर घ्यावा, असा सल्ला केंद्रीय गृह सचिवांकडून देण्यात आला आहे. पत्रातून केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उत्सवासंबंधी सभा, सार्वजनिक परिवहन संचालन, शॉपिंग कॉम्पलेक्स, चित्रपटगृह, जीम, स्पा, रेस्टारंट तसेच बार, शाळा-महाविद्यालये, कार्यालये तसेच इतर व्यावसायिक गतीविधींचा उल्लेख केला आहे. परवानग्या दिल्यानंतर मास्क घालणे, भौतिक दुरत्वाच्या नियमाचे पालन, स्वच्छता तसेच बंद खोल्यांमधील खेळत्या हवेसंबंधी राष्ट्रव्यापी निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे देखील त्यांनी पत्रातून स्पष्ट केले.

Back to top button