Russia vs Ukraine : एअर इंडियाच्या विशेष विमानाने युक्रेनमधील भारतीयांची घरवापसी | पुढारी

Russia vs Ukraine : एअर इंडियाच्या विशेष विमानाने युक्रेनमधील भारतीयांची घरवापसी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रशियाकडून करण्यात आलेल्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना तात्काळ मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकली आहेत. दरम्यान, गुरूवारी सकाळी एअर इंडियाच्या विशेष विमान १८२ नागरिकांना घेवून दिल्ली विमानतळावर उतरले. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान लॅन्ड झाले. (Russia vs Ukraine)

युद्धभूमीतून सुखरूप परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर बराच तणाव तसेच भीती दिसून आली. बुधवारी रात्री विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये ३० दिवसांच्या आपात्कालीन स्थितीसंबंधीचा संदेश मिळाल्यानंतर ते मायदेशी परतले. अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. भारतीय दूतावासाकडून अँडव्हायजरी मिळाल्यानंतर मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलतांना दिली. (Russia vs Ukraine)

दरम्यान युक्रेन ने देशांतर्गत नागरिक विमान उड्डाणांवर बंदी घातल्याने भारतीयांना मायदेशी परत घेवून येण्यासाठी रवाना झालेले एअर इंडियाचे एक विमान अर्धा रस्त्यातूनच परतावे लागले. युक्रेनवर रशियाने हल्ला चढवल्यानंतर अनेक भारतीयांचे जीव धोक्यात आले आहे. केंद्र सरकार सातत्याने स्थितीवर लक्ष ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनमध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Russia vs Ukraine)

भारतीय नागरिक १८००११८७९७ या टोल फ्री क्रमांकावर तसेच कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी +९१ ११ २३०१२११३, +९१ ११ २३०१४१०४, +९१ ११ २३०१७९०५ या क्रमांकावर संपर्क साधू शकतील. युक्रेन ची राजधानी कीव मध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीयांनी शांतता ठेवून सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. युक्रेन मधील स्थिती बरीच नाजुक आहे. युक्रेन मध्ये देखील भारतीय दुतावासाने २४ तास कार्यरत आपात्कालीन हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असल्याची माहिती हाती आली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button