नवाब मलिकांच्या अटके विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे निदर्शने | पुढारी

नवाब मलिकांच्या अटके विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे निदर्शने

धुळे पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना आकसापोटी ईडीने अटक केल्याचा आरोप करीत आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निदर्शने करीत कारवाईचा निषेध केला आहे. इडीचा अशाच प्रकारे गैरवापर होत राहिल्यास राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

राष्ट्रवादीचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र देऊन भावना व्यक्त करण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले. यावेळी भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. भाजपा तथा केंद्र सरकार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत आहे. ईडीचा दुरुपयोग करुन देशात चूकीचा पायंडा पाडत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. जनतेने निवडून दिलेले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. केंद्रातील भाजपा सरकार मनमानी कारभार व हुकूमशाही पध्दतीने,सूडबुध्दीने ईडीचा गैरवापर करीत असल्याचा आरोप करीत या सर्व गोष्टींचा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेध केला आहे.

ही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. हे असेच चालू राहिले तर पक्ष तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. यावेळी रणजीत भोसले, जोसेफ मलबारी, सत्यजित सिसोदे, राजेंद्र चितोडकर, विजय वाघ, जगन ताकटे, सलीम लंबू, सरोज कदम, तरुणा पाटील, जया सांळूखे, चेतना मोरे, प्रमोद सांळूखे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

हेही वाचा :

 

Back to top button