

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठीची 25 टक्के आरक्षण जागांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 16 फेबुवारी पासून इतर जिल्ह्यामध्ये टप्प्याने सुरू झाली आहे.
मात्र, पुणे जिल्ह्यात अद्याप सुरू झालेली नाही. वेबसाईटवर देखील जिल्हा निवडच्या ऑप्शनमध्ये पुणे जिल्हाच दाखवित नसल्याने पालकांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न पडला आहे.
फेबुवारी महिना संपत आला तरी अद्याप आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची तारीख निश्चित नसल्यामुळे पालक हैराण झाले आहेत. पालक प्रवेश अर्ज भरण्यासाठी रोज मदत केंद्रांवर हजेरी लावत आहेत.
मात्र, वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज भरताना सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये इतर जिल्ह्यांची नावे दिसत आहेत. पण पुणे जिल्ह्याचे नाव दिसत नाही.
आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरण्याची मुदत 16 फेबुवारी दिलेली होती.
मात्र, पहिल्याच दिवशी वेबसाईट ओपन होत नसल्यामुळे पालकांना अर्ज भरण्यास असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. सकाळपासून अर्ज भरण्यासाठी गेलेल्या पालकांना दुपार झाली तरी अर्ज भरता आला नाही.
आरटीईचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी वारंवार तांत्रिक बिघाड होणे, संकेतस्थळावर जिल्हा सिलेक्ट न होणे यामुळे एकही अर्ज भरता आला नाही.
अर्ज भरण्यासाठी पालकांनी खास सुट्टी घेतली होती. आरटीईच्या बदललेल्या वेळापत्रकाविषयी कोणत्याही सूचना मिळत नसल्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सर्व कामे सोडून आरटीई प्रवेश अर्जाच्या तारखेकडे पालकांचे लागून राहिले आहे. पालकांना मदतीसाठी कोणतीही हेल्पलाईन नसल्यामुळे कोणतीही माहिती मिळत नाही. प्रवेश भरण्याविषयी अजूनही शासनाकडून कोणत्याच सूचना आल्या नसल्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे.