शेतीला दिवसा वीज, पीक कर्जमाफी आणि मेगा भरती : राजस्थानचे बजेट | पुढारी

शेतीला दिवसा वीज, पीक कर्जमाफी आणि मेगा भरती : राजस्थानचे बजेट

जयपूर , पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 

राजस्थान सरकारने बुधवारी बजेट सादर केले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हे बजेट सादर केले. बजेटमध्ये विविध नाविन्यपूर्ण घोषणांचा समावेश आहे. विशेष करून कृषी बजेट यावेळी प्रथमच स्वतंत्र सादर करण्यात आले. शेतीसाठी दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध असेल अशी मोठी घोषणा गेहलोत यांनी केली. तसेच शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ कऱण्यासाठी २५०० कोटींची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये १.२५ लाख रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू असून १ लाख जागांवर भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर आहे, अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय राज्यातील बेरोजगारांना वर्षांतील १२५ दिवस रोजगार उपलब्ध होण्यासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय MNREGA योजनेत काही बदल करून या योजनेत रोजगाराची उपलब्धता सुटसुटीत केली जाणार आहे.
तसेच Rajasthan Eligibility Examination for Teachers ही परीक्षा जुलै महिन्यात घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. या परीक्षेअंतर्गंत भरण्यात येणाऱ्या जागांची संख्या ३२ हजारवरून ६२ हजार करण्यात आली आहे. याशिवाय या परीक्षातर्थींकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही, तसेच फसवणूक विरोधी पथकाचीही स्थापना केली जाणार आहे.

या बजेटमध्ये गेहलोत यांनी शिक्षण आणि आरोग्य यासाठीच्या पायाभूत सुविधांवर अधिक भर दिलेला आहे. ३८२० इतक्या सरकारी शाळांतील सुविधांत सुधारणा केली जाणार आहे. तसेच शहरी आणि ग्रामीण भागात १ हजार नव्या इंग्रजी शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच १९ जिल्ह्यांत मुलींसाठी ३६ नवे महाविद्यालये सुरू केले जाणार आहेत.

याशिवाय राजस्थानचे जे विद्यार्थी दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी दिल्लीत हॉस्टेलही उभे केले जाणार आहे. २५० खोल्यांच्या या हॉस्टेलसाठी ३०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. राजस्थानमधील १६ जिल्ह्यांत शेतीसाठी दिवसा वीज दिली जाते. उर्वरित १७ जिल्ह्यांतही आता शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी राज्यातील वीज निर्मितीत मोठी सुधारणा करण्यासाठी स्वतंत्र योजना जाहीर करण्यात आली आहे.

हे ही वाचा  

Back to top button