

सातारा : सुनील क्षीरसागर
गडकोट हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेले अनेक किल्ले सातारा जिल्ह्यात आहेत. मराठ्यांच्या असीम शौर्याचे प्रतीक असलेल्या या गडकोटांचे जतन होणे गरजेचे आहे. आजच्या शिवजयंतीदिनी तसा संकल्प करूया. दरम्यान, पुरातत्त्व खात्यानेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने मध्यंतरी राज्यातील गडकोट दुरुस्त करण्यासाठी निधीही मंजूर केला होता. काही ठिकाणी दुरुस्तीही झाली. खरं तर सर्वच गडकोटांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
शिवकालातील गडांचा अभेद्यपणा, शत्रूवर नजर ठेवण्याचे मोक्याचे स्थान, शत्रूला बराच काळ रोखून ठेवण्याचे त्यांचे सामर्थ्य, त्याचा बेलागपणा, असे सर्व गुण हेरून छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या कडेकपारीतील गडकोटांचा चांगला उपयोग करून घेतला होता. अनेक गड शत्रूवर हल्ला करून ताब्यात घेतले तसेच अनेक किल्ल्यांची त्यांनी उभारणी केली. छत्रपती शिवरायांनी बांधून घेतलेला बुलंद प्रतापगड हे याचेच उशवरायांनी बांधून घेतलेला बुलंद प्रतापगड हे याचेच उदाहरण. सातारा जिल्ह्यातील जवळपास 25 किल्ले मराठ्यांच्या इतिहासाचे साक्षीदार असून या ऐतिहासिक गडकोटांचे जतन झाले पाहिजे. त्यांची पुनर्बांधणीही व्हायला हवी.
शिवकालात बांधण्यात आलेल्या प्रत्येक गडकोटावर पाण्याच्या व्यवस्थेसाठी तळी, तलाव बांधण्यात आले होते. त्या काळी दगडात खोदण्यात आलेली ही तळी आजही असंख्य किल्ल्यांवर शिवकालाची साक्ष देत आहेत. मात्र, त्यातील पाणी वापरता येण्यासारखे नाही. शासनाने एखादी योजना आखून ही तळी, तलाव स्वच्छ करणे गरजेचे आहे. असे झाले तर तळी व तलावांमधील स्रोत जिवंत होऊन स्वच्छ आणि चवदार पाणी पर्यटकांना प्यायला मिळेल.
शिवकालीन पराक्रमाची साक्ष देत गेली 350 वर्षे उभे असलेले गडकोट आजही अभेद्य असून त्यावर इतिहासकालीन शस्त्रांची प्रदर्शने भरवायला हवीत. त्यामुळे नवीन पिढीला शिवकालीन इतिहासाचे अवलोकन करता येईल. त्यापासून त्यांना वेगळी प्रेरणा मिळेल.
हे ही वाचलं का