कोल्हापूर जिल्ह्यात २२४ उपचार केंद्रांवर कोरोनाचा एकही रुग्ण नाही! | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात २२४ उपचार केंद्रांवर कोरोनाचा एकही रुग्ण नाही!

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : पाश्‍चिमात्य देशांतील विविध संस्थांनी भारतासाठी अत्यंत धोकादायक आणि मोठ्या संख्येने बळी पडण्याचे भाकीत केलेली कोरोनाची तिसरी लाट कोल्हापुरातून ओसरते आहे. या लाटेचे सूप वाजण्याच्या तयारीत असताना कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनावर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या अवघी 42 वर आली आहे.

जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालये आणि निर्माण केलेल्या कोव्हिड सेंटर्स अशा एकत्रित 230 केंद्रांपैकी अवघी 6 रुग्णालये वगळता उर्वरित सर्व ठिकाणी रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. यामुळे आणखी प्रतिबंधात्मक उपायांचा काटेकोर वापर केला, तर या महिनाअखेर जिल्हा कोरोना भयमुक्त होण्याकडे वाटचाल करू शकतो.

कोल्हापुरात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये साथीने थैमान घातले होते. पहिल्या लाटेत देशातील लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण कोल्हापुरात दगावले. दुसर्‍या लाटेतही कमी-अधिक प्रमाणात स्थिती सारखीच होती. यामुळे तिसर्‍या लाटेचे भय कोल्हापूरकरांच्या खांद्यावर मोठे होते. या लाटेतही अपुर्‍या उपचार सुविधांच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरकरांनी निर्धाराने त्याला तोंड दिल्याचे निष्पन्न झाले आहे. तिसर्‍या लाटेत रोगाचा संसर्गच झपाट्याने झाला.

यामुळे रुग्णसंख्येचा आलेख बघताबघता चढत जाऊन उपचाराधीन रुग्णसंख्या 3 हजारांचा टप्पा ओलांडून गेली. यामुळे पुन्हा तालुकानिहाय कोरोना सेंटर्स उभी करावी लागली. तथापि, यातील 90 टक्क्यांहून अधिक रुग्णांनी घरीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली, तर रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णसंख्येचा आलेख घसरून मंगळवारी 42 वर आला होता.

यातील सीपीआर रुग्णालयात 16, अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात 10, अ‍ॅपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये 5, डायमंड हॉस्पिटल व इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात प्रत्येकी 4 आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 3 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी व्हेंटिलेटरवर 5 रुग्ण आहेत, तर ऑक्सिजनचा आधार घेतलेल्या रुग्णांची संख्या अवघी 8 असल्याने कोल्हापुरातील कोरोनातून बर्‍या होणार्‍या रुग्णांची टक्केवारी 97.06 इतकी झाली आहे.

केवळ कोल्हापुरातीलच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपर्‍यांतून आलेल्या आणि शेजारील राज्यांतून दाखल झालेल्या रुग्णांनाही उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली गेली. अशा जिल्ह्याबाहेरील रुग्णांची एकत्रित संख्या 10 हजारांच्या उंबरठ्यावर आली आहे. शिवाय, जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णसंख्येचा आकडा 2 लाख 20 हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 60 हजार 175 रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत, तर कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 94 हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्या खालोखाल हातकणंगले तालुक्यात 24 हजार 352 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली, तर सर्वात कमी 66 रुग्णसंख्या मलकापूर नगरपालिका हद्दीत नोंदवली गेली आहे.

कोरोनाच्या पहिल्या तीन लाटांमध्ये मंगळवारपर्यंत एकत्रित 5 हजार 902 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये कोल्हापूर शहरातील 1 हजार 295, तर ग्रामीण भागातील 3 हजार 143 रुग्णांचा समावेश होता. इचलकरंजी शहरात 528 रुग्ण दगावले, तर जिल्ह्याबाहेरून आणि राज्याबाहेरून उपचारासाठी आलेल्या आणि जीव गमावण्याची वेळ आलेल्या रुग्णांची संख्या 618 आहे.

सध्या कोल्हापुरात 553 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. यापैकी 42 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर उर्वरितांवर घरीच उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्येचा हा झपाट्याने घसरणारा आलेख पाहता प्रतिबंधात्मक उपायांची खबरदारी घेतली, तर अल्पावधीत कोरोनाचे मळभ दूर होऊ शकते.

* एकूण बाधितांच्या संख्येने 2 लाख 20 हजारांचा टप्पा ओलांडला
* जिल्हा व राज्याबाहेरील रुग्णांची संख्या 10 हजारांवर
* कोल्हापूर शहरासह करवीरमधील रुग्णसंख्या 94 हजारांच्या घरात
* जिल्ह्यातील कोरोनाचे आजवरचे एकूण बळी 5 हजार 902

Back to top button