नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पंजाबमधील खालिस्तानचे समर्थक असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते कुमार विश्वास यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. एक दिवस आपण पंजाबचे मुख्यमंत्री तरी बनणार अथवा स्वतंत्र खालिस्तान देशाचे पंतप्रधान तरी बनणार, असे केजरीवाल यांनी आपल्याला एकेदिवशी सांगितले होते. मात्र फुटीरतावाद्यांचा साथ घेऊ नका, असा सल्ला आपण त्यांना दिला होता, असा दावा विश्वास यांनी केला.
केजरीवाल यांनी मला मुख्यमंत्री बनण्याचा फॉर्म्युला सांगितला होता, असे सांगून कुमार विश्वास पुढे म्हणाले की, पंजाब एक राज्य नसून ती भावना आहे. अशावेळी एका इसमाने (केजरीवाल) पंजाबच्या गत विधानसभा निवडणुकीवेळी फुटीरतावादी आणि खालिस्तानी लोकांची मदत घेतली होती. तसे करण्यासाठी आपण त्या इसमास विरोध केला होता. पण ती व्यक्ती आजही त्याच्या विचारावर कायम असून सत्तेसाठी ती काहीही करु शकते. त्या व्यक्तीस केवळ सत्ता हवी आहे. 2020 साली रेफरंडम येणार आहे.
सगळे जग त्यासाठी पैसा पुरवित आहे, असे आपण सांगितले असता, तर काय झाले…स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान बनेन, असे उत्तर त्या व्यक्तीने दिले होते. सदर इसमाच्या विचारात इतका फुटीरतावाद आहे की त्याला कोणत्याही मार्गाने सत्ताच हवी आहे. कुमार विश्वास हे आम आदमी पक्षाच्या स्थापनेच्या आधीपासून केजरीवाल यांच्यासोबत होते. मात्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी 2017 साली त्यांची संगत सोडली होती. विश्वास यांच्याप्रमाणे आशुतोष, योगेंद्र यादव आदी नेत्यांनीही आम आदमी पक्षाला त्या दरम्यान रामराम केला होता. कुमार विश्वास यांच्या आरोपांच्या काही तासाआधीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्यावर आरोप केले होते. झाडूच्या सर्वात मोठ्या नेत्याला दहशतवाद्याच्या घरी पाहिले जाऊ शकते, असे गांधी यांनी सांगितले होते.