लक्ष विचलित करण्यासाठी नेहरूंवर टीका : राहुल गांधी | पुढारी

लक्ष विचलित करण्यासाठी नेहरूंवर टीका : राहुल गांधी

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील पर्यावरण आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून गोमंतकियांचे लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे नेहरूंना लक्ष्य करीत आहेत. वर्षाला दोन कोटी नोकर्‍या निर्माण करण्याच्या आणि काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याच्या त्यांच्याच आश्‍वासनाबद्दल ते का बोलत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

भाजपच्या जाहीरनाम्यात पर्यावरणाविषयी एकही शब्द नाही

मडगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहरू यांच्या काळातील भारताचा इतिहास आणि दुसर्‍या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची कोणतीच जाण नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पर्यावरणासारख्या मुख्य प्रश्‍नापासून गोव्यातील लोकांचे लक्ष विचलित करत आहेत. ते पर्यावरण आणि रोजगाराबाबत सभेत काहीच बोलले नाहीत. भाजपच्या जाहीरनाम्यात पर्यावरणाविषयी एकही शब्द नाही. राज्यातील तीन वादग्रस्त प्रकल्प काँग्रेस सरकार सत्तेत येताच रद्द केले जातील.

गोव्यातील बेरोजगारीचा विषय सोडविण्यास भाजप सरकार अपयशी

‘गोव्यातील बेरोजगारीचा विषय सोडविण्यास भाजप सरकार अपयशी ठरले आहे. काँग्रेस सत्तेत येताच हा विषय प्राधान्याने सोडवू. रोजगारनिर्मितीसाठी पाचशे कोटींचा निधी प्रस्तावित आहे. याशिवाय गोव्याला आयटी आणि नॉलेज हब बनविण्यासाठी आमचा प्रस्ताव आहे.

काँग्रेसने गोवेकरांच्या भावनांचा आदर करून पक्षांतर केलेल्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळवून सरकार स्थापन केले जाईल, असा विश्‍वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

हेही वाचलतं का?

Back to top button