

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) धक्कादायक विधान करत अप्रत्यक्षरित्या माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) आणि माजी कोच रवी शास्त्री (ravi shastri) यांच्यावर निशाणा साधला आहे. रहाणे म्हणाला की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी काही चांगले निर्णय घेतले पण त्याचे श्रेय दुसऱ्याने घेतल्याचे त्याने विधान केले आहे. रहाणे याच्या विधानानंतर भारतीय क्रिकेटमध्ये नवा वाद निर्माण सुरू झाला आहे की काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून कसोटी मालिका 2-1 ने जिंकून इतिहास रचला होता. अॅडलेडमधील पहिल्या सामन्यात संघाला वाईट रीतीने पराभवाचा सामना करावा लागला आणि टीम इंडिया आपल्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर (36) ऑलआऊट झाली होती. यानंतर कर्णधार विराट कोहली भारतात परतला आणि उर्वरित सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) कर्णधारपद भूषवले. यादरम्यान रहाणेने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला.
मात्र, ऑस्ट्रेलियातील मालिका विजयाचे आणि त्या काळात घेतलेल्या निर्णयांचे श्रेय दुसऱ्याने लाटल्याचा अप्रत्यक्षरित्या आरोप रहाणेने केला आहे. रहाणेने कोणाचेही नाव घेतलेले नाही. 'बॅकस्टेज विथ बोरिया' या चॅट शोमध्ये अजिंक्य रहाणे म्हणाला बोलत होता. तो म्हणाला की, 'मी तिथे काय केले हे मला माहित आहे आणि मला याबद्दल कोणाला काही सांगण्याची गरज नाही. मला श्रेय घेणे आवडत नाही. होय असे काही महत्त्वाचे निर्णय होते जे मी प्राप्त परिस्थितीत घेतले. पण मी घेतलेल्या निर्णयचे श्रेय दुसऱ्याने घेतले. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मालिका जिंकली. हा खूप ऐतिहासिक विजय होता आणि म्हणूनच तो विशेष होता', असे त्याने सांगितले.
रहाणे (Ajinkya Rahane) फार काही बोलत नाही, पण त्याने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य करत आपली व्यथा मांडली आहे. रहाणे गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या फॉर्मशी झगडत आहे आणि अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते तो भारतासाठी शेवटची कसोटी खेळला आहे, मात्र रहाणेला संघात पुनरागमन करायचे आहे.
रहाणे पुढे म्हणाला, 'या विजयानंतर असे काहींनी म्हटले की, मी हे केले-मी ते केले, तो निर्णय माझा होता. पण खरंतर मी काय निर्णय घेतले हे मलाच ठाऊक होते. तसेच त्या निर्णयांबद्दल मी व्यवस्थापनाला पूर्व कल्पना देत असे. मी कधीही स्वतःचा किंवा कौतुक केले नाही. मी नेहमीच संघाची कामगिरी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्राध्यान्य दिले आहे. जेव्हा लोक म्हणतात की माझी कारकीर्द संपली आहे तेव्हा मी हसतो. ज्यांना खेळ माहित आहे ते असे बोलत नाहीत. ऑस्ट्रेलियात काय घडले ते सर्वांनाच ठाऊक आहे. लाल चेंडूच्या खेळात माझे योगदान आहे आणि या खेळावर प्रेम करणारे लोक सुज्ञपणे बोलतील,' अशीही त्याने मिश्कील टीप्पणी केली.