नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) हे त्यांच्या शब्दसंग्रह आणि इंग्रजीच्या ज्ञानामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. थरूर यांच्या शब्दकोशातून कधी कधी असे 'न ऐकलेल्या' शब्दांचा उल्लेख होतो की तुमच्या डोक्याला ताण देऊनही तो भेटत नाही. थरुर यांच्या इंग्रजीमुळे भल्याभल्यांची बोबडी वळते.
मात्र, शशी थरूर यांनी एक ट्वीट करताना चूक केली. ही चूक चक्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निदर्शनास आणून दिली. त्यांनी ही चूक काय आहे हे ही सांगितले.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत संसदेतील बजेट विषयीचा फोटो ट्विट केला आहे. या छायाचित्रात रामदास आठवलेही दिसत आहेत. थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अर्थसंकल्पावर सुमारे दोन तास चर्चा चालली.
मंत्री रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्यचकित भाव सर्व काही सांगत आहेत. अगदी पुढच्या रांगेत असलेल्यांनाही अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेल्या अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्पाबाबत विश्वास बसत नाही असे दिसून येत आहे.
थरूर यांच्या ट्विटमधील चुकांवर नजर टाकत केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, प्रिय शशी थरूर जी, अनावश्यक दावे आणि विधाने करताना चुका होणे स्वाभाविक आहे, असे म्हटले जाते.
येथे 'Bydget' नसून 'BUDGET' असेल. जसेकी RELY नाहीतर REPLY असा अर्थ होतो. पण आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. असे आठवले यांनी थरूर यांना सांगितले आहे.
शशी थरूर ट्विटरवर खूप सक्रिय असतात आणि ट्विटरच्या माध्यमातून लोकांसमोर सतत अनेक समस्यांवर बोलतात.