किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार | पुढारी

किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याची आणि कोव्हिड सेंटर वरील घोटाळ्यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांची भेट घेत तक्रार केली आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना-भाजप वाद शिगेला पोहोचताना दिसतोय. आज दिल्लीत किरीट सोमय्या, गिरीश महाजन, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आदी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन तक्रार केली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मिळूनच पुण्याचे पोलिस कमिश्नर अमिताभ गुप्ता यांचा आधार घेत मला मारण्याचा प्रयत्न केला  असल्याचा आरोप केला. आमच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग्स आहेत, ज्यामध्ये शिवसेनेचे लोक मोठमोठे दगड मारताना दिसत आहेत असेही किरीट सोमय्या यावेळी बोलताना म्हणाले. भाजपच्या शिष्टमंडळाने संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

भाजपच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मनोज कोटक यांनीही शिवसेनेवर आरोप केले आहेत. केंद्रीय गृहसचिवांकडे किरीट सोमय्यांवरिल झालेल्या हल्ल्याची आणि कोव्हिड सेंटर मधील घोटाळ्यांची माहिती दिली आहे. गृहमंत्रालयाकडून कारवाई केली जाईल, असे आम्हाला आश्वासित करण्यात आले असल्याचे मनोज कोटक म्हणाले आहेत.

किरीट सोमय्यांवर पुणे महानगरपालिकेच्या परिसरात शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

हेही वाचलतं का?

 

Back to top button