अलीकडे कॉफी हे भलतंच प्रतिष्ठेचं पेय झालेलं आहे नैका? किती झालं, तरी चायपे नुसती चर्चा होते, कॉफीवर डायरेक्ट प्रेमं-बिमं जमतात. वैश्विक चोखंदळपणा, क्लास वगैरे ठरतो. लाटे, कॅपुचिनो इ. कॉफीचा कप आणि कॉफी टेबल बुक ज्या टेबलावर असेल त्या टेबलाचं सांस्कृतिक बल वाढतं. हे सगळं पाहूनच बहुधा पुणे मनपाने आपल्या कोरोना काळातल्या कामगिरीचं चित्रमय दर्शन घडवण्यासाठी कॉफी टेबलबुकचं स्वप्न पाहिलं.
मनपाकडे स्वतःचे माहिती, तंत्रज्ञान, जनसंपर्क वगैरे विभाग असूनही या मानाच्या प्रकल्पाची निविदा आरोग्य विभागाने काढली, तिच्यात कोणा 'लाडक्या' ठेकेदाराचे खासे हितसंबंध जपले, तब्बल तीस लाख रुपयांची तरतूद केली वगैरे बातम्या आता बाहेर येताहेत. विशेष म्हणजे, मनपाचा स्वतःचा अद्ययावत छापखाना असूनही एवढं कवतिकाचं कॉफी टेबल बुक बाहेरून छापून घेण्याचा घाट घातला. यातल्या आत्मतृप्ततेवर, स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यावर, उधळपट्टीवर चौफेर टीका होत आहे. हे बघून आम्हाला वाईट वाटते आहे.
कबूल आहे, ही कॉफी अंमळ महाग आहे! कबूल आहे, हिच्या व्यवहारात जराशा 'गाळलेल्या जागा' दिसताहेत; पण त्या कुठे नसतात? शिवाय समजा या बातमीत एका अक्षराचीच फक्त गफलत असेल तर? आम्हाला तरी तशीच शंका येत्येय. खरं म्हणजे, मनपाला 'माफी टेबल बुक' काढायचं होतं. इतक्या नेक, प्रांजळ, जनसेवालीन आस्थापनेला लोकांच्या सुखदुःखांबाबत आस्था असणारच ना? ती अनावर झाल्यानेच मनपाने 'माफी टेबल बुक'ची शक्यता चाचपडली होती. कचरा कुंड्या घाणीने वाहून शहराचं आरोग्य धोक्यात आणताहेत? माफी असावी. रस्त्यांच्या दुर्दशेने नागरिकांच्या पायांच्या, कंबरेच्या हाडांची दुर्दशा होत्येय? माफी असावी.
ट्रॅफिकची समस्या दुर्धर होत चाललीये? माफी असावी. एन.ए. टॅक्स कसाही आकारला जातोय? माफी असावी. असं एकेका गैरसोयीबद्दल त्या 'माफी टेबल बुक'च्या एकेका पानावर द्यायचं घाटत होतं. एवढा प्रांजळपणा जगात दुसर्या कोणीही दाखवला नसेल. असं बुक आलं असतं, तर त्या गिनीज बुकात मनपाचं नाव सहजच गेलं असतं; पण नेमका 'मा' चा 'कॉ' पडला आणि महाभारत घडलं.
'ध' चा 'मा' पडल्याने किती अनर्थ ओढवला होता, हे आठवतंय ना मंडळी? त्याचीच ही पुढची पायरी समजावी आणि समोर येईल ते 'बुक' स्वीकारावं असं याठिकाणी सुचवावंस वाटतं. हे जे बुक असेल, जे पुस्तक असेल, किंबहुना जे चोपडं असेल, ते आमच्या बंधूंनी, भगिनींनी आणि मातांनी गोड मानून घ्यावं. कॉफी जेवढी महागडी तेवढी तिची गोडी अवीट, हे विसरू नये.