Lata Mangeshkar : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यातही दुखवटा जाहीर | पुढारी

Lata Mangeshkar : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यातही दुखवटा जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने उद्या सुट्टी जाहीर केली आहे. आज सायंकाळी ७ वाजता भारतरत्न गानसाम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

देशातील अनेक राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात दुखवटा जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी यांनीही लतादीदींना एक आगळी वेगळीच श्रद्धांजली वाहिली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना त्यांनी जाहीर केले की, ‘पुढील १५ दिवस पश्चिम बंगालमधील सार्वजनिक ठिकाणे, सरकारी इमारती आणि ट्रॅफिक सिग्नलवर लता मंगेशकर यांची गाणी ऐकवली जातील’.

पश्चिम बंगाल सरकारने देखील 7 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. ( Lata Mangeshkar )

तसेच कर्नाटक सरकारनेही लतादीदींना अनोखी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या स्मरणार्थ दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. यासोबतच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमांना बंदी असेल आणि राष्ट्रध्वज अर्धवट राहील, असं म्हटले आहे.

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आले होते. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचलत का?

Back to top button