लता मंगेशकर यांच्या निधनाने उद्या राज्यात सुट्टी : मुख्यमंत्री ठाकरे

लता मंगेशकर यांच्या निधनाने उद्या राज्यात सुट्टी : मुख्यमंत्री ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचं कोरोना आणि न्युमोनियाने आज मुंबईच्या ब्रिच कॅंडी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या जाण्याने संगीत आणि गायनविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. लतादिदींच्या निधनाने राज्यासह जगभरात मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करून राज्यात उद्या (सोमवारी) दुखवट्याची सुट्टी जाहीर केलेली आहे.

लतादीदींना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनानंतर न्यूमोनियाचीही लागण झाली होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांचे व्हेंटिलेटर तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र शनिवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले.

काल केंद्रीय मंत्री पियूष गोयल, लतादीदींचे बंधू आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदींनी ब्रीच कॅन्डी रुग्णालयास भेट देऊन लतादीदींच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे विचारणा केली. लता मंगेशकर  लवकरात लवकर बर्‍या व्हाव्यात असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगेशकर कुटुंबीयांना देण्यास सांगितल्याची माहिती पियूष गोयल यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी दुपारी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन मंगेशकर कुटुंबीयांची भेट घेतली. कोरोना संसर्ग होऊनही तसेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत मास्कचा वापर न करणार्‍या राज ठाकरे यांनी रुग्णालयात जातांना मास्क लावला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देखील रुग्णालयात जाऊन लता दीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि आशा भोसले यांनी देखील ब्रीच कॅन्डी येथे जाऊन डॉक्टरांशी चर्चा केल्याची माहिती देण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news