दलित राजकारणाचा गड ‘दोआब’ ठरेल ‘किंगमेकर’ | पुढारी

दलित राजकारणाचा गड ‘दोआब’ ठरेल ‘किंगमेकर’

पंजाब पुढारी वृत्तसेवाः पंजाबच्या राजकारणात ‘दोआब’ क्षेत्र सर्वात लहान आहे. विधानसभेच्या 117 पैकी 23 विधानसभा जागा या भागात येतात. परंतु, दलित राजकारणाचा गड अशी ओळख असलेला हा भाग हल्ली प्रकाशझोतात आहे. सतलज आणि व्यास नदीच्या किनार्‍याने वेढलेल्या ‘दोआब’ला विशेष महत्त्व आहे. 16 फेब्रुवारीला संत रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी रविदास समाजाने केली होती. पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्‍नी यांच्यासह इतर राजकीय पक्षांनी या मागणीच्या समर्थनार्थ पत्र लिहून मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यामुळे मतदानाची तारीख 20 फेब्रुवारी केली गेली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पंजाबच्या राजकारणात दलितांकडून केलेली मागणी प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांना हटवून दलित-शीख चरणजित सिंह चन्‍नी मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याच्या संपूर्ण राजकारण दलित वोट बँकेच्या अवतीभवती एकवटले आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी 32 टक्के लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. परंतु, माझा क्षेत्र (29.3 टक्के) आणि मालवा क्षेत्राच्या (31.3 टक्के) तुलनेत दोआबामध्ये दलित मतदारांची संख्या सर्वाधिक (37.4 टक्के) आहे. हीच बाब दोआबला पंजाबच्या दलित राजकारणाच्या केंद्रस्थानी आणते. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या भागात जवळपास 40 टक्के जागा दलितांसाठी आरक्षित आहेत, तर मालवातील 27 टक्के आणि माझातील 24 टक्के जागा राखीव आहेत. दोआबमध्ये रविदास समाजाचे वर्चस्व आहे. (दलित राजकारण पंजाब)

जालंधर येथील डेरा सचखंड बल्लां रविदास समाजाचे महत्त्वाचे स्थान आहे. समाजाचे सर्वच निर्णय येथून होतात. डेर्‍यातर्फे वाराणसीमध्ये गुरू रविदासजी यांच्या जन्मस्थळी धार्मिक स्थळ उभारले आहे. दरवर्षी रविदास जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने पंजाबमधील भाविक वाराणसीला दर्शनासाठी जातात. डेर्‍याचा दोआबमध्ये खास प्रभाव आहे. रविदासिया समाज दोआबमध्ये जय-पराजय ठरवतो. याच डेर्‍याच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्‍नी यांनी निवडणूक आयोगाला मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली होती, हे विशेष! डेरा सचखंड बल्लांमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनीदेखील हजेरी लावली होती. काँग्रेसने 2017 च्या निवडणुकीत दोआबमधील 23 पैकी 15 जागांवर विजय मिळवला होता. दोआबच्या जागेवर काँग्रेसला आपला प्रभाव कमी होऊ द्यायचा नाही. (दलित राजकारण पंजाब)

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्‍नी स्वत: रविदास समाजातून येतात. त्यांची डेरा सचखंड बल्लांवर श्रद्धा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी डेर्‍यात मुक्‍कामदेखील केला. त्यातून अनेक संकेतही दिले. पंजाबमध्ये दलितांची संख्या इतकी मोठी असूनही आतापर्यंत येथे दलित मुख्यमंत्री झाला नव्हता. अशात स्वाभाविकरीत्या चन्‍नी यांच्याप्रती दलित समाजात सहानुभूती आहे. परंतु, ती मतदानात परिवर्तित करणे कठीण काम आहे. दोआबमधील जातीय समीकरणांना दुरुस्त करण्यासाठी अकाली दलाने मायावती यांच्या बसपासोबत युती केली आहे. 2007 आणि 2012 मध्ये दोआबमधून अकाली दलाला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. दोआब क्षेत्र पंजाबचा एनआरआय बेल्ट म्हणूनदेखील ओळखले जाते. पंजाबमधून विदेशात जाण्याची प्रथा दोआबमधूनच सुरू झाली. जगातील इतर देशांमध्ये वसण्यासाठी याच भागातून स्थलांतर झाले. पंजाबमध्ये दहशतवाद सुरू झाल्यानंतर या भागातील तरुणांनी विदेशात स्थलांतर सुरू केले होते. अशात आता हे क्षेत्र पंजाबच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावू शकते. (दलित राजकारण पंजाब)

हेही वाचलतं का?

Back to top button