‘मालवा’ ठरवणार पंजाबचा मुख्यमंत्री! | पुढारी

‘मालवा’ ठरवणार पंजाबचा मुख्यमंत्री!

पंजाब, वार्तापत्र : पंकज कुमार मिश्रा (चंदीगड) : विधानसभा निवडणुकीत पंजाब सर करायचे असेल, तर विजयाचा मार्ग मालवा मतदारसंघातून जातो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, हे आतापर्यंतच्या आकडेवारीवरूनही दिसून येते. या भागात राजकीय दबदबा ठेवणारा पक्षच पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यात आतापर्यंत यशस्वी झाला आहे. विधानसभेच्या 117 पैकी 69 जागा मालवा भागात येतात. 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विराजमान करण्यात मालवाचे सर्वाधिक योगदान होते. मालवातील 69 पैकी 40 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या, तर 2012 मध्ये सलग दुसर्‍यांदा प्रकाशसिंह बादल यांना मुख्यमंत्री बनवण्यातही मालवाचीच भूमिका मोठी होती.

सतलज नदीच्या दक्षिणेकडे येणार्‍या मालवा क्षेत्रात बरनाला, भटिंडा, फरीदकोट, फतिहगढ साहीब, फिरोजपूर, लुधियाना, मानसा, मोगा, मुक्‍तसर, पटियाला, संगरूर, फाजिल्का जिल्हे येतात. मालवा क्षेत्रात सामाजिक तसेच राजकीयद‍ृष्ट्या जाट-शिखांचे प्राबल्य आहे. पंजाबच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत पंजाबचा मुख्यमंत्री जाट-शीख समाजातूनच होत होता. पहिल्यांदाच चन्‍नींच्या रूपाने दलित-शीख मुख्यमंत्री बनला आहे. पंजाबच्या 18 मुख्यमंत्र्यांपैकी 15 मुख्यमंत्र्यांचा संबंध मालवा क्षेत्राशी होता. यावरून या भागाचे राजकीय महत्त्व समजू शकेल.

पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंह बादल मालवा क्षेत्रातील गिद्दडबाहा मतदारसंघातून विजय मिळवून पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. तद्नंतर चार वेळा मुख्यमंत्री पदावर आरूढ असताना ते मालवा क्षेत्रातील लांबी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. कॅप्टन अमरिंदर सिंग मालवा क्षेत्रात येणार्‍या त्यांच्या पटियाला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत मुख्यमंत्री झाले होते. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले गुरनाम सिंह मालवा क्षेत्रातील किला रायपूरमधून विजयी झाले होते. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्‍नीदेखील मालवातील चमकौर साहिब मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

मुख्यमंत्रिपदाचे चेहरे येथूनच लढतात

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले सर्वच प्रमुख चेहरे मालवा क्षेत्रातून निवडणूक लढवतात. काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलेला नाही. परंतु, चन्‍नी यांना मालवा क्षेत्रातील चमकौर साहिबमधून रिंगणात उतरवून राजकीय संकेत दिल्याचे बोलले जात आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सुखबीरसिंह बादल मालवातील जलालाबाद विधानसभा, तसेच आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान मालवातील धुरी येथून लढत आहेत. पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग पटियालातून निवडणूक लढवणार आहेत.

गतवेळची स्थिती

2017 च्या निवडणुकीत मालवाच्या मतदारांनी काँग्रेसला एकतर्फी साथ दिली. काँग्रेसला 40 जागांवर विजय मिळाला, तर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवणार्‍या आपने 18 जागा जिंकल्या होत्या. या क्षेत्रातील यशाच्या जोरावरच आप मुख्य विरोधी पक्ष बनला. मालवा क्षेत्रात सर्वात मोठा फटका शिरोमणी अकाली दलाला बसला. त्यांना केवळ 8 जागा जिंकता आल्या होत्या.

भाजप तसेच नव्याने स्थापन झालेल्या लोक इन्साफ पार्टीला 2 जागा मिळाल्या होत्या. 2012 मध्ये मालवाच्या मतदारांनी शिरोमणी अकाली दलाच्या पारड्यात 33 जागा टाकल्या, तर काँग्रेसला 32 जागा मिळाल्या होता. भाजपला केवळ 2 जागा मिळाल्या. 2012 मध्ये मालवाच्या 69 पैकी शिरोली अकाली दलाला 37 आमदारांचे समर्थन मिळाले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button