प्रजासत्ताक दिन : गुगल डुडलमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन  | पुढारी

प्रजासत्ताक दिन : गुगल डुडलमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन 

पुढारी ऑनलाईन डेस्क : ७३ व्या प्रजासत्ताक दिन असल्याचे औचित्य साधून गुगलने एक खास डुडल तयार केलं आहे. त्यातून भारतीय संस्कृती आणि भारतीय वारसा पहायला मिळत आहे. गुगलच्या डुडलमुळे संपूर्ण जगात भारताची संस्कृती आणि वारसा पोहोचत आहे, प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे.

गुगलच्या डुडलमध्ये उंड, हत्ती, घोडे, ढोल आणि तिरंगा यांचा वापर केलेला आहे. गुगलने मागील वर्षीही ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतील अनेक संस्कृतीची झलक दाखवली होती. तर ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगीबिरंगी डुडल तयार केले होते. गुगलने आपल्या गुगलच्या डुडलमध्ये राष्ट्रीय पक्षी मोर, विविध कलाप्रकार आणि नृत्यप्रकार दाखविलेले होते.

आज प्रजासत्ताक दिन या निमित्ताने दिल्लीमध्ये यावर्षी देखील राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. भव्य परेडचेही आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नॅशनल वॉर मेमोरियल म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहचून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतील.

त्याचबरोबर १० वाजून २६ मिनिटांनी ध्वजारोहण होईल आणि राष्ट्रगीत म्हटले जाईल. या दरम्यान २१ तोफांची सलामी दिली जाईल. १० वाजून २८ मिनिटांनी राष्ट्रपती सलामी मंचावर जम्मू काश्मीरचे पोलीस एएसआय बाबू राम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करतील. १० वाजून ३० मिनिटांनी वायुसेनेचे चार हेलिकॉप्टर राजपथावरील आकाशात भरारी घेतील.

या हेलिकॉप्टर्समधील एकावर भारताचा झेंडा असेल तर उरलेल्या तिघांवर तीन दलांचे (नौदल, वायूदल, लष्कर) झेंडे असतील. हे सर्व हेलिकॉप्टर प्रेक्षकांवर आकाशातून फुलांचा वर्षाव करणार आहेत. यासोबतच २६ जानेवारीच्या परेडची सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम, देशातील परमवीर चक्र विजेते आणि अशोक चक्र विजेते खुल्या जिप्सीमध्ये राजपथवर पोहोचतील आणि राष्ट्रपतींना अभिवादन करतील.

Back to top button