काकडी, खिऱ्याच्या निर्यातीत जगात भारत अव्वल स्थानी ! | पुढारी

काकडी, खिऱ्याच्या निर्यातीत जगात भारत अव्वल स्थानी !

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

भारत जगात काकडीची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे. २०२०-२१ दरम्यान एप्रिल ते ऑक्टोबर या काळात देशाने जगात काकडी आणि खिरी काकडीची १ लाख २३ हजार ८४६ मेट्रिक टन म्हणजेच, ११४ दक्षलक्ष डॉलर्सची निर्यात केली. भारताने गेल्या आर्थिक वर्षात, कृषि प्रक्रिया उत्पादने, लोणच्याची काकडी अशा पदार्थांच्या उत्पादनात, २०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक मूल्यांची निर्यात केली.जगभरात काकडी आणि लोणच्याची काकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कृषिमालात देशाच्या निर्यातीत वाढ झाली आहे.

२०२०-२१ या वर्षात, भारताने २ लाख २३ हजार ५१५ मेट्रिक टन काकडीची, म्हणजेच २२३ दशलक्ष डॉलर्स मूल्यांच्या काकडीची निर्यात केली.जगाच्या एकूण काकडी/खिऱ्याच्या आवश्यकतेपैकी १५% उत्पादन एकट्या भारतात होते.उत्तर अमेरिका, युरोप, फ्रान्स सह सध्या २० हून अधिक देशात भारत निर्यात करीत आहे. करारबद्ध शेती अंतर्गत ९० हजार छोटे तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून दरवर्षी ६५ हजार एकरातून खिऱ्याचे उत्पादन घेतले जात आहे.

सरासरी एक काकडी, खिरा उत्पादक शेतकरी ९० दिवसांच्या पिकातून एकरामागे ४ मेट्रिक टनाचे उत्पादन घेत ४० हजार रूपयांच्या निव्वळ नफ्यासह जवळपास ८० हजार रूपये कमावितो.शेतकरी वर्षातून दोन वेळा पीक घेतो. विदेशी खरेदीदारांची आवश्यकता पुर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मापदंडानूसार प्रक्रिया संयंत्र उभारण्यात आल्याचे देखील केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, वाणिज्य विभागाच्या निर्देशांनुसार, कृषि आणि अन्नप्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) पायाभूत विकास, जागतिक बाजारात उत्पादन प्रोत्साहन देण्याबाबत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याशिवाय, अन्नप्रक्रिया केंद्रात अन्न सुरक्षा व्यवस्थापनाच्याही उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचलत का?

Back to top button