Gold Price Today : सोन्याची ५० हजारांकडे झेप?; चांदीही तेजीत, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold Price Today : सोन्याची ५० हजारांकडे झेप?; चांदीही तेजीत, जाणून घ्या नवे दर

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Price Today : देशातील सराफा बाजारांत सोन्याच्या दरात तेजी आली आहे. सोन्याचा दर आज गुरुवारी (दि.२०) प्रति १० ग्रॅम ४८,६०० रुपयांच्या पार झाला. सोन्यासह चांदीही महागली आहे. सोन्याच्या दरात आज ३७० रुपयांची वाढ झाली. यामुळे प्रति १० ग्रॅम सोने ४८,६२० रुपयांवर पोहोचले. तर चांदीचा प्रति किलो दर ६४,४०४ रुपयांवर गेला आहे.

सराफा बाजारात आज (Gold Price Today) २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,६२० रुपयांवर खुला झाला. काल बुधवारी सोन्याचा दर ४८,२५० रुपयांवर जाऊन बंद झाला. त्यात आज ३७० रुपयांची तेजी आली. २३ कॅरेट सोने ४८,४२५ रुपये आहे. २२ कॅरेट सोने ४४,५३६ रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ३६,४६५ रुपये आहे.

चांदीचा प्रति किलो दर काल बुधवारी ६३,५५७ रुपये होता. त्यात ८४७ रुपयांची तेजी आली आहे. यामुळे चांदीचा दर ६४,४०४ रुपयांवर पोहोचला आहे.

२०२१ वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत दर खाली आल्याने सोन्याची झळाळी कमी झाली होती. पण कोरोना- ओमायक्रॉन महामारीचे संकट, महागाईची चिंता यामुळे नवीन वर्ष २०२२ मध्ये सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर (प्रति तोळी) ५५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज याआधी सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

२०२० मध्ये सोने दरात मोठी तेजी आली होती. दोन वर्षापूर्वी सोन्याच्या दराने ५६,२०० रुपयांपर्यंत उसळी घेत उच्चांक गाठला होता. पण २०२१ मधील ऑगस्टमध्ये सोने ४८ हजार रुपयांवर आले. त्यानंतर दरात चढ-उतार सुरुच आहे.

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापुरी साज बनतो तरी कसा? चला पाहूया | Kolhapuri Saaj

Back to top button