Vodafone Idea मध्ये सरकारची मोठी हिस्सेदारी, निर्णयानंतर शेअर्समध्ये मोठी घसरण | पुढारी

Vodafone Idea मध्ये सरकारची मोठी हिस्सेदारी, निर्णयानंतर शेअर्समध्ये मोठी घसरण

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

थकीत रक्कम आणि व्याजाच्या बदल्यात भारत सरकारला खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपनी ‘व्होडाफोन आयडिया’ मध्ये (Vodafone Idea) मोठी हिस्सेदारी मिळणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती व्होडाफोन आयडियाकडून मंगळवारी देण्यात आली.

व्होडाफोन आयडियाचे सरकारला मोठे देणे आहे. स्पेक्ट्रम लिलावातील हप्ते, त्यावरील वापराचे शुल्क आणि या सर्व रकमेवरील व्याज अशी ही थकीते आहेत. ही रक्कम 16 हजार कोटी रुपयांच्या पुढे आहे. या रकमेच्या बदल्यात सरकारला समभाग देण्याचा प्रस्ताव कंपनीने दिला होता. सरकारने सदर प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर व्होडाफोन आयडियामध्ये सरकारला 35.8 टक्के इतके समभाग प्राप्त होतील.

थोडक्यात आगामी काळात व्होडाफोन आयडियामध्ये सरकारची हिस्सेदारी सर्वात जास्त असणार आहे. सध्या प्रवर्तक समूहाकडे 28.5 टक्के समभाग असून आदित्य बिर्ला समूहाकडे सुमारे 17.8 टक्के समभाग आहेत. कंपनीने दिलेल्या प्रस्तावाला दूरसंचार विभागाची मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. व्होडाफोन आयडियाच्या समभागाचे मूल्य 10 रुपये गृहीत धरून सरकारची देय रक्कम इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने या निर्णयाची माहिती दिल्यानंतर व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone Idea) शेअर्समध्ये (समभाग) मोठी घसरण झाली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मोराने दोस्ती शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही | Peacock viral video

Back to top button