

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महिला गटात महाराष्ट्र संघाने साखळी सामन्यात बिहार संघाचा 24-0 असा धुव्वा उडवत गटात अव्वल स्थान पटकावले. या दणदणीत विजयासह महाराष्ट्राच्या महिला रग्बी संघ बाद फेरीत दाखल झाला. महाराष्ट्र महिला संघाच्या आक्रमक डावपेचांसमोर बिहार संघाचा टिकाव लागू शकला नाही. भारताची कर्णधार आणि महाराष्ट्र संघाची कर्णधार वाबिद भरुचा, कल्याणी पाटील व उज्वला घुगे यांनी अफलातून कामगिरी बजावली.
कल्याणी पाटील हिने 10 गुण तर उज्वला घुगे हिने पाच गुण संघाला मिळवून दिले. कर्णधार भरुचाची कामगिरी लक्षवेधक ठरली. तिने एक ट्राय व दोन कन्व्हर्जन करून 9 गुण संघाला मिळवून देत विजयात मोलाचा वाटा उचलला.
पुरुष गटात साखळी लढतीत महाराष्ट्र रग्बी संघाला हरियाणा संघाकडून 14-17 असा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भरत चव्हाण व श्रीधर निगडे यांनी झुंज अयशस्वी ठरली. दोघांनी प्रत्येकी पाच पाच गुण मिळवले. बबलू यादव व श्रीधर निगडे यांनी दोन दोन गुण कन्व्हर्जनचे मिळवून दिले.
या पराभवानंतर अ गटात महाराष्ट्र संघाची चांगली कामगिरी असल्याने महाराष्ट्र संघाने बाद फेरी गाठली आहे. बाद फेरीत महाराष्ट्र पुरूष संघाचा सामना ओडिशा संघाशी होणार आहे.