

प्रसाद जगताप
पुणे : पीएमपीमध्ये दर वर्षी विविध कारणांनी कमी होत जाणार्या कर्मचार्यांची संख्या 400 च्या घरात असल्याने ताफ्यातील बस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरविणे प्रशासनाला अवघड झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पीएमपीचे चालू वर्षात आतापर्यंत 382 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. अपघाती आणि अन्य कारणाने मृत्युमुखी पडलेले कर्मचारी, तसेच प्रशासनाने गंभीर चुकीमुळे कायमचे बडतर्फ केलेले कर्मचारी यामुळे 400 जण पीएमपीच्या ताफ्यातून कमी झाले.
पुणे शहराच्या 40 लाख लोकसंख्येनुसार 1 लाख प्रवाशांकरिता 50 बसची आवश्यकता आहे. त्यानुसार पुणे शहराला 3 हजार 500 बस आवश्यक आहेत. मात्र, सध्या पीएमपीकडे 2 हजारच बस आहेत. आणि त्यातील फक्त 1650 बसच रस्त्यावर असतात. त्यामुळे पुणेकरांना वेळेत पीएमपीच्या बस उपलब्ध होत नाहीत. तसेच, बस आलीच तर प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब भरून येते.
'पीक अवर'मध्ये तर प्रवाशांना अक्षरश: दरवाज्यातच लटकून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पुणेकर नागरिक बस ऐवजी स्वत: वाहन खरेदी करून प्रवास करण्यावर भर देतात. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील पीएमपीची सार्वजनिक वाहतूक सुविधा कोलमडलेली आहे.
कमतरतेमुळे 625 चालकांना बनविले वाहक
पीएमपी प्रशासनाला चालू वर्षात अचानक वाहकांची आवश्यकता भासली. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ताफ्यातील चालकांनाच प्रशिक्षण देऊन वाहक बनविले आहे. तब्बल 625 चालकांना पीएमपी प्रशासनाने वाहक केले. आणखी नव्या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होत आहेत. त्याकरिता आणखी वाहकांची पीएमपी प्रशासनाला आवश्यकता भासणार आहे.
2 हजार वाहकांची भरती प्रक्रिया
सध्या पीएमपी प्रशासनाला नव्याने ताफ्यात दाखल होणार्या गाड्यांसाठी आणखी वाहकांची आवश्यकता आहे. त्याकरिता पीएमपी प्रशासनाने 2 हजार वाहकांची भरती प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे. त्याकरिता आवश्यक असलेली भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.
दोन्ही शहराची लोकसंख्या लक्षात घेत, आम्ही जास्तीत जास्त बस रस्त्यावर उतरवत आहोत. प्रवाशांना वेळेत सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात 200 गाड्या ताफ्यात दाखल होणार असून, 2 हजार वाहकांची भरती करण्यात येणार आहे.
– दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल
ताफ्यातील बससंख्या
स्व-मालकीच्या – 1012
भाडेतत्त्वावरील – 1130
एकूण – 2 हजार 142
सीएनजी – 1594
डिझेल – 150
इलेक्ट्रिक – 398
रोजच्या रस्त्यावर
उतरणार्या बस – 1650
आणखी नव्या ताफ्यात
येणार्या गाड्या – 200 ई-बस
ताफ्यातील कर्मचारी
चालक – 2 हजार 296
वाहक – 4 हजार 776
प्रशासकीय कर्मचारी – 600
अभियांत्रिकी (वर्कशॉप)-
1 हजार 100
सुरक्षा कर्मचारी – 675
एकूण – 9 हजार 22
ठेकेदारांचे चालक – 2 हजार 500