दौंडच्या पूर्व भागात संततधार; शेती पिकांचे नुकसान, शेतकरी हवालदिल | पुढारी

दौंडच्या पूर्व भागात संततधार; शेती पिकांचे नुकसान, शेतकरी हवालदिल

रावणगाव; पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला दिवसभर संततधार पावसाने चांगलेच झोडपले. अनेक गावांत शंभर मि.मी.पर्यंत पाऊस पडला. पिके पाण्याखाली गेली आहेत. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी अनेक गावांच्या शेतकर्‍यांनी केली आहे. बोरीबेल, स्वामी चिंचोली, रावणगाव, खडकी, खानोटा, मलठण या गावांमध्ये रविवारी (दि. 25) सायंकाळी चालू झालेला पाऊस सोमवारी (दि. 26) दिवसभर चालल्याने हजारो हेक्टरवरती पिकांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये टोमॅटो पिकासह इतर काही पालेभाज्या मका, बाजरी, नव्याने लागवड केलेला ऊस या पिकांना मोठा फटका बसला आहे. बोरीबेल येथील पर्जन्यमाप केंद्रावर 85 मि.मी पाऊस पडलेला दाखवत आहे. बोरीबेल येथील प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण पाचपुते व स्वामी चिंचोली गावचे माजी सरपंच अझरुद्दीन शेख यांनी तातडीने शासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर व इतर शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकारी दौंड – पुरंदर तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.

Back to top button