National Camera Day 2023 : बेळगावातील फोटोग्राफरचे वेड; घराला दिला कॅमेराचा लुक

National Camera Day 2023 : बेळगावातील फोटोग्राफरचे वेड; घराला दिला कॅमेराचा लुक
Published on
Updated on

बेळगाव; सुनील गावडे :  एखाद्याचे घर कॅमेर्‍याच्या आकाराचे आहे अन् त्याच्या घरात चालतेबोलते कॅमेरेही आहेत, असे कुणी सांगितले तर चटकन विश्वास बसणार नाही. पण, बेळगावात तसे घडले आहे. कॅमेरा अन् फोटोग्राफीची आवड असलेल्या एका फोटोग्राफरने आपल्या मुलांची नावे चक्क कॅमेर्‍यांच्या ब्रँडवरून ठेवली आहेत. शिवाय घरही कॅमेर्‍याच्या आकारात बांधले आहे. (National Camera Day 2023)

रवी होंगल फोटोग्राफरचे नाव असून त्यांचे कॅमेर्‍याचे वेड आता सातासमुद्रापार पोचले आहे. रवी होंगल यांना लहानपणापासूनच फोटोग्राफीची आवड. यातून त्यांनी 1986 मध्ये फोटोग्राफी व्यवसाय सुरु केला. एसपीएम रोडवर त्यांचा फोटो स्टुडिओ आहे. पत्नी कृपा यांच्या साथीने ते व्यवसाय सांभाळतात. कॅमेर्‍याच्या वेडातूनच त्यांनी पहिला मुलगा झाल्यानंतर त्याचे नाव कॅनन ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबियांनी विरोध केला. पण, पत्नी कृपालाही ते नाव आवडले. तिने सर्वांची समजूत काढली. अन् पहिल्या बाळाचे कॅनन या नावाने बारसे झाले. त्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला. पहिल्या बाळाच्या नावाला अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे उत्साह दुणावलेल्या रवी यांनी दुसर्‍या मुलाचे नामकरण निकॉन असे केले. तर तिसर्‍या मुलाचे नाव इप्सन ठेवले आहे! होंगल यांचा आणखी एक छंद म्हणजे ते आपल्या तिन्ही मुलांचे जन्मापासून रोज फोटो काढतात आणि संग्रही ठेवतात. (National Camera Day 2023)

71 लाख खर्च

मुलांना कॅमेर्‍याची नावे दिल्यानंतरही रवी यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्यातून त्यांनी आपले घर कॅमेर्‍याच्या आकारात बांधण्याची योजना आखली. 2017 मध्ये शास्त्रीनगरमधील पाचव्या क्रॉसवर घर बांधायला सुरवात केली. तत्पूर्वी आर्किटेक्टकडून आपल्याला हवे तसे डिझाईन करवून घेतले. अडीच वर्षानंतर त्यांचे तीन मजली कॅमेरा घर प्रत्यक्षात उतरले. त्यांच्या घराच्या तळमजला इप्सनच्या फोटो प्रिंटरसारखा आहे. दुसर्‍या मजल्याला निकॉनच्या कॅमेर्‍याचा लूक देण्यात आला आहे. तर तिसरा मजला कॅनन कॅमेर्‍याच्या फ्लॅशसारखा आहे. (National Camera Day 2023)

आकर्षणाचा केंद्रबिंदू

घराच्या दर्शनी भागावरील खिडक्या लेन्स व व्ह्यू फाईंडरच्या आकारात आहेत. दर्शनी भागावर फिल्म स्ट्रीप व मेमरी कार्डही कोरलेले आहे. छत आणि भिंतीही कॅमेर्‍याच्या इतर भागांच्या आकाराच्या आहेत. घराच्या आतही कॅमेर्‍याच्या अंतर्भागाचा लूक देण्यात आला आहे. दूरवरुन पाहिले तर जणू एखादा कॅमेरा जमिनीवर ठेवला आहे असा भास होतो. घराला त्यांनी नाव दिलेय 'क्लिक'.

मला कॅमेर्‍यांची फार आवड आहे. कॅमेर्‍यासारखे एक घर असावे, असे माझे स्वप्न होते. ते महत्प्रयासाने पूर्ण केले आहे. आज अनेकजण खास घराचे फोटो काढण्यासाठी येतात. काहीजण या घरासोबत सेल्फीही काढतात.
– रवी होंगल, फोटोग्राफर, बेळगाव.

        हेही वाचा ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news