Titan submarine : समुद्रातून काढण्यात आले टायटन पाणबुडीचे अवशेष | पुढारी

Titan submarine : समुद्रातून काढण्यात आले टायटन पाणबुडीचे अवशेष

टोरंटो; पुढारी ऑनलाईन : अटलांटिक महासागरात स्फोटानंतर नष्ट झालेल्या टायटन पाणबुडीचे तुकड्यात विखुरलेले अवशेष बुधवारी किनाऱ्यावर आणण्यात आले. यात पाणबुडीच्या वाकलेल्या मेटलच्या शीटसह अनेक तुटलेले तुकड्यांचा समावेश आहे. कॅनडातील न्यूफाउंडलँडच्या सेंट जॉन्स येथे होरायझन आर्क्टिक जहाजातून हे पाणबुडीचे अवशेष आणण्यात आले. (Titan submarine)

सांगण्यात येत आहे की, तपास पथकाला पाणबुडीचे १० तुकडे मिळाले आहेत. पाणबुडीचे हे सांगाडे उतरवत असताना त्यांना कापडाने झाकण्यात आले होते. टायटन पाणबुडीचे हे तुकडे तब्बल १० दिवसांनी आढळले आहेत. टायटॅनिक जहाजाची पाहणीकरण्यासाठी गेलेल्या या टायटन पाणबुडीत स्फोट झाल्यामुळे पाणबुडीतील ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. (Titan submarine)

पाणबुडीत दोन अब्जाधीशांसह ५ होते प्रवासी(Titan submarine)

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश प्रिन्स दाऊद (वय 48), त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद (वय १९), ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग (वय ५५), फ्रेंच एक्सप्लोरर पॉल-हेन्री नार्गिओलेट (वय ७७) आणि टायटॅनिक टूर ऑपरेटर ओशनगेटचे ६१ वर्षांचे सीईओ स्टॉकटन रश यांचा सहभाग होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व प्रवासी स्फोटाच्या मिलिसेकंदातच मरण पावले होते.

मात्र, रविवारी पाणबुडी गायब होऊन स्फोट झाल्यानंतर पाणबुडीला शोधण्याची मोहीम ही गुरुवार पर्यंत चालू होती. यादरम्यान १० हजार चौरस मैल परिसरात टायटन पाणबुडीची शोध आणि बचाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अमेरिका आणि कॅनडाच्या नौदलाचाही सहभाग होता.

टायटॅनिकच्या अवशेषाजवळ सापडलेले तुकडे

गुरुवारी टायटन पाणबुडीचे अवशेष सापडल्यानंतर शोध आणि बचाव कार्य मागे घेण्यात आले. यूएस कोस्ट गार्डने सांगितले की टायटॅनिकच्या अवशेषापासून १६०० फूट अंतरावर दोन ठिकाणी पाणबुडीचे तुकडे सापडले आहेत. जी समुद्राच्या पृष्ठभागापासून १२५०० फूट खाली आहे. ज्यामध्ये दहा टन वजनाच्या टायटन पाणबुडीचा मागील भाग, लँडिंग फ्रेम आणि फॉरवर्ड भाग समाविष्ट होता. होरायझन आर्क्टिक नावाच्या जहाजातून खोल समुद्रातील रोबोट पाणबुडीने हे अवशेष शोधून काढले.

मृतदेह सापडण्याची शक्यता नाही

तज्ज्ञांच्या मते, टायटन पाणबुडीत असलेल्या पाच प्रवाशांचे मृतदेह सापडण्याची शक्यता नाही. त्याच वेळी, कॅनडाच्या ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्डाने सांगितले की त्यांच्या तपासाला दोन वर्षे लागू शकतात.

अधिक वाचा :

Back to top button