Nashik Murder : बाचाबाचीतून मित्राचा भोसकून खून, अपघाताचा बनाव करून संशयितांनीच केले रुग्णालयात दाखल

Nashik Murder : बाचाबाचीतून मित्राचा भोसकून खून, अपघाताचा बनाव करून संशयितांनीच केले रुग्णालयात दाखल
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

किरकोळ बाचाबाचीतून दोघांनी मिळून एका मित्राचा खून केल्याची घटना शिवाजीनगर परिसरात घडली. या घटनेनंतर दोघांनी जखमी मित्रास जिल्हा रुग्णालयात दाखल केले व अपघातात मित्र गंभीर जखमी झाल्याचे सांगितले. मात्र, अंबड पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला व पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर खुनाचा गुन्हा उघडकीस आला.

विश्वनाथ ऊर्फ बबलू भीमराव सोनवणे (२६, रा. रामेश्वर कॉलनी, सातपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर समशेर रफिक शेख (४०, कार्बन नाका) व दीपक अशोक सोनवणे (रा. श्रमिकनगर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. शनिवारी (दि.२६) रात्री आठच्या सुमारास दोघा संशयितांनी जखमी अवस्थेतील विश्वनाथ सोनवणे यास जिल्हा रुग्णालयात आणले. त्यावेळी त्यांनी अपघातात मित्र गंभीर जखमी झाल्याचे सांगितले. दरम्यान, त्याचवेळी अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक रुग्णालयात संशयितांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी आलेले असताना त्यांना संशय आला. दोन्ही मित्रांचे शर्ट रक्ताने माखलेले असल्याने व जखमी युवकाच्या शरीरावरील जखमांमुळे पोलिसांनी दोघांनाही जिल्हा रुग्णालय पोलिस चौकीत बसवले. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी केल्यानंतर हा प्रकार अपघाताचा नाही तर घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गंगापूर पोलिसांना बोलवण्यात आले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत शनिवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाल्यानंतर विश्वनाथने दुसऱ्या मित्राची बाजू घेतल्याने संशयित समशेर व दीपक यांनी विश्वनाथला मारहाण करीत समशेरने त्याच्याकडील शस्त्राने वार करून विश्वनाथचा खून केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनाच्या घटनांनी नाशिक हादरले

नाशिक शहरात खुनाच्या घटनांचे सत्र सुरू झाले आहे. सोशल मीडिया त्याला कारण ठरते आहे. गटबाजी आणि वर्चस्ववादाची किनार असलेल्या या दहशती कृत्याला पायबंद बसण्याची चिन्हे दिसत नाहीत. महापालिका निवडणुकांपर्यंत अशा प्रकारच्या घटना वाढतील, असे बोलले जाते आहे. परिसरातील वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्यासाठीही अल्पवयीन मुलांमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. गुन्हेगारांची काढलेली वरात म्हणजे त्यांना दिलेली पदवी ठरते आहे. वरात काढण्याच्या पद्धतीवरच नागरिकांनी आक्षेप घेतला असून, गुन्हेगारांवर जरबच बसवायची असेल तर उत्तर प्रदेशचा फंडा वापरा, अशी मागणी त्रस्त नागरिकांमधून केली जाते आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news