Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार

Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार
Published on
Updated on

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील वासदा नजीक गुजरात सिमेलगत असलेल्या गोंदुणे ग्रामपंचायत मधील केळीपाडा येथे स्मशानभूमीला शेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. स्मशानशेड अभावी पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना या गावातील नागरिकांना चितेवर सागाच्या पानांची पलान शिवून उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. मृत्यूनंतरही मरणयातना सोसण्याची वेळ इथल्या मृतदेहांवर आली आहे.

गावातील सोमेश कुवर या युवकाचे अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळपासूनच संततधार पाऊस सुरु आणि एकीकडे स्मशानभूमी शेडच नाही, त्यामुळे अंत्यसंस्कार कोठे करायचे हा मोठा प्रश्न कुटुंबाला पडला.  या भागात अंत्यसंस्कार हे अग्निडाग, मुखाग्नी देऊन केले जातात. धो-धो पडणा-या पावसात मृतात्म्यांस अग्नी देणे शक्य नव्हते. शिवाय लाकडे पण ओली असल्याने अजून पेचप्रसंग निर्माण झाला. शेवटी चितेवर ताडपत्री व सागाच्या पानांची पलान शिवून धरण्यात आली. पलान म्हणजे सागाची अनेक पसरट पाने काडीने शिवून तयार केलेले असते. पूर्वी पावसाळ्यात छत्री नसल्याने पलान शिवून पावसापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर पलान ठेवत असत. येथेही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पलान शिवून धरावी लागली. असे करत चितेला अग्नी देण्यात आला.

हीच ती पलान पावसाळ्यात छत्री ऐवजी पानाने शिवून डोक्यावर घेतलेली नैसर्गिक छत्री (फोटो-संग्रहित)
हीच ती पलान पावसाळ्यात छत्री ऐवजी पानाने शिवून डोक्यावर घेतलेली नैसर्गिक छत्री (फोटो-संग्रहित)

केळीपाडा येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने विशेषतः पावसाळ्यात खूपच हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शेतीच्या बांधावरुन, काटाकुट्यातून प्रेत यात्रा काढावी लागते. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. मरणानंतरही इथं मरणयातना संपत नाहीत.

भर पावसात सुरु असलेले अंत्यसंस्कार
भर पावसात सुरु असलेले अंत्यसंस्कार

आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागते हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमी पर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते. काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गोंदुणे ग्रामपंचायतीत अद्यापही दहा ते बारा गावात स्मशानभूमी शेड नाही. उर्वरित गावात तात्काळ स्मशानभूमी शेड मंजूर करण्यात यावेत अशी मागणी येथील गणेश वाघ, दिपक मेघा, चिनू धूम, नवसू मेघा, सोनीराम वाडेकर, संजय भोये, कांती धुम, बाबुराव चौधरी, तुळशीराम भोये, जयवंत मेघा, महेश भोये यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

गोंदुणे ग्रामपंचायतीत अजूनही दहा ते बारा गावात स्मशानभूमी शेड नाहीत. त्यामुळे उघड्यावर अंतिमसंस्कार करावे लागतात. त्यामुळे पावसाळ्यात आकस्मिक निधन झाले तर सरण रचायलाही खूप अडचणी येतात. स्मशानशेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. जनसुविधा अथवा ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी शेड उभारून दिल्यास सोयीचे होईल."

– मधुकर कुवर, केळीपाडा.
मयताचे वडील.

स्मशानभूमी शेडच्या बांधकामासाठी प्रशासनाकडे नावे पाठवली आहेत. तसेच रोजगार हमी योजनेतून रस्ता मंजूर करण्यात येणार आहे. जागा खाजगी मालकाची असल्याने कागद पत्रांची पूर्तता करून काम सुरु करण्यात येईल.
स्मशानभूमी शेड उभारून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल."
– जी. आर. देशमुख
(ग्रामसेवक गोंदुणे)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news