Nashik Crime : ‘त्या’ फरार संशयित आरोपीचा विहीरीत सापडला मृतदेह, दोघांचे निलंबन

Nashik Crime : ‘त्या’ फरार संशयित आरोपीचा विहीरीत सापडला मृतदेह, दोघांचे निलंबन
Published on
Updated on

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा, दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण लागताना पीडित युवतीच्या मृत्यूनंतर फरारी संशयित आरोपीनेसुद्धा स्वत: च्या शेतातील विहिरीत उडी घेत जीवन संपवून घेतल्याचे मंगळवारी उघड झाले. दरम्यान, संशयित आरोपी फरारी झाल्याने दिंडोरी पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस नाईक असे दोघांचे निलंबन करण्यात आले.  (Nashik Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील उमेश बंडू खांदवे (35) या विवाहित ग्रामपंचायत सदस्याने पिंपळणारेतील युवतीला विवाहाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले होते. युवतीने या प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी संशयित आरोपी खांदवे याला अटक केल्यानंतर दिंडोरी न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दिंडोरी पोलिस अंजनेरीवरून संशयितासह स्थळ पंचनामा करून परतत असताना खांदवे गंगापूरनजीक लघुशंकेचा बहाणा करून पोलिसांच्या हाताला झटका देऊन फरार झाला होता. त्यानंतर पीडित युवतीने विहिरीत दोन दिवसांपूर्वी उडी घेऊन जीवन संपवून घेतले होते. 28 सप्टेंबरला खांदवे रात्रीच्या सुमारास पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी त्याच्याच शेतातील विहिरीच्या कडेला कपडे व चपला सापडल्या होत्या. तेथे असलेल्या चिठ्ठीत गावातील काही व्यक्तींनी त्याला यासाठी प्रवृत्त केल्याचे नमूद केल्याचे खांदवेने लिहिले होते. (Nashik Crime)

दोन दिवस उपसले पाणी

आपत्ती व्यवस्थापन टीमने मृतदेह शोधण्यासाठी सलग दोन दिवस तीन मोटारींच्या सहाय्याने पाणी उपसले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास उमेशच्या भावाला विहिरीत मृतदेह आढळला. त्याने तत्काळ दिंडोरी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे व दिंडोरी पोलिस तेथे दाखल झाले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाच्या पायाला मोठा दगड बांधल्याचे आढळले.

मृतदेहाचे धुळ्यात शवविच्छेदन

दिंडोरी न्यायाधीशांसमोर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळ्याच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे. कळवणचे पोलिस उपविभागीय अधिकारी एस. आर. बाबंळे तपास करीत आहेत.

तपास अधिकारी निलंबित

पोलिस तपास करताना आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. त्यानंतर पीडित युवतीने जीवन संपवले. त्याचबरोबर फरार आरोपीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळला. यात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिंडोरीचे पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे व पोलिस नाईक सुदाम धुमाळ या दोघांना निलंबित केले आहे. पोलिस तपासात कोणतीही शंकेची बाब येऊ नये, म्हणून या गुन्ह्याचा तपास कळवण विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी एस. आर. बाबंळे यांच्याकडे देण्यात आले आहे.

फरार आरोपी उमेश खांदवे याने मृत्यूपूर्वी आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या काही व्यक्तींची नावे लिहून ठेवली आहेत. याबाबत सखोल चौकशी करून सत्यता पडताळण्यात येईल. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाहीसाठी गुन्हा नोंद करण्यात येईल.

– एस. आर. बाबंळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, कळवण

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news