

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाने गाजत असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यासह भोगावती आणि आजरा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबवली होती, त्या टप्प्यापासून सोमवार, दि. 9 ऑक्टोबरपासून ती पुढे सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. यामुळे वारणा, महालक्ष्मी बँकेसह सुमारे अडीच हजार संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
पावसाळा आणि संभाव्य पूरस्थितीच्या कारणास्तव राज्य शासनाने जून महिन्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांची परिस्थिती 30 सप्टेंबरपर्यंत आहे त्या स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे संस्थांची निवडणूक प्रक्रिया ठप्प होती. ही स्थगिती राज्य शासनाने उठवल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली होती, तेथून पुढे ती सुरू करण्याचे आदेश दिल्याने या संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील दोन महिने जिल्ह्यात अडीच हजारांवर संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
स्थगितीपूर्वी भोगावती साखर कारखान्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आलेल्या अर्जाची छाननी होणार होती, तोपर्यंत स्थगिती मिळाली होती. आता अर्ज छाननीनंतर या कारखान्याच्या निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर मतदान व मतमोजणीची तारीख जाहीर होईल.
न्यायालयाच्या आदेशानंतर बिद्रीची पुढील प्रक्रिया
पावसाच्या कारणास्तव बिद्रीची निवडणूक पुढे ढकलावी यासाठी आ. प्रकाश आबिटकर गटाच्या वतीने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. आजरा कारखान्याच्या बाबतीतही तोच प्रकार घडला होता. आता पावसाळा संपला आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणानेही निवडणुका सुरू करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे बिद्री आणि आजरा कारखान्याच्या निवडणुकीसाठी न्यायालयाने दिलेली स्थगिती उठल्यानंतरच या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीची पुढील प्रक्रिया होणार आहे.
वारणा व महालक्ष्मी बँकेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच आठ विकास संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. याखेरीज जिल्ह्यातील दोन हजारावर क आणि ड गटातील दूध संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.