नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Published on
Updated on

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

गुन्ह्याच्या तपासाकामी जात असताना जळगाव जिल्ह्यात पोलिस वाहनावर झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील रहिवासी व जळगाव जिल्ह्यात कार्यरत एपीआय सुदर्शन दातीर यांच्यावर अंबड गावातील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाइकांसह शासकीय अधिकारी, विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-कासोदाकडे जात असताना अंजनी धरणाजवळील रस्त्यावर आर्थिक गुन्हे शाखा पथकाच्या गाडीवर गुरुवारी (दि.२९) रात्री ८.४५ च्या सुमारास अचानक झाड कोसळले. या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर (रा. अंबड गाव, नाशिक) व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणाच्या तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत एपीआय सुदर्शन दातीर हे अंबड येथील रहिवासी असून, त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच अंबड गावावर शोककळा पसरली. रात्री अनेक गावकरी वाहनाने जळगावकडे रवाना झाले होते. शुक्रवारी दुपारी त्यांचे पार्थिव अंबड येथील निवासस्थानी आणल्यानंतर नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला. दुपारी २.३० च्या सुमारास अंबड गाव येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी 'सुदर्शन दातीर अमर रहे'च्या घोषणा दिल्या. यावेळी आमदार सीमा हिरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. बी. जी. शेखर, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर, मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील आदींसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. दातीर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. शेतकऱ्याचा मुलगा ते पोलिस अधिकारी अशी ओळख असलेल्या दातीर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news