Nashik : भुताळा-भुताळीण ठरवून वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण

Nashik : भुताळा-भुताळीण ठरवून वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्तेच्या पिंपळाचा पाडा येथील एका मृत्यूला वृद्ध दाम्पत्यास जबाबदार धरण्यात आले असून भुताळा व भुताळीन समजून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. याबाबत हरसुल पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबाबत पाठपुरावा करत आहे.

पिंपळाचा पाडा येथील भीमा बारकू तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरात मधील मोहपाडा येथे दोन दिवसापूर्वी त्यांच्या पुतणीकडे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कळमुस्ते या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूला त्यांचा सख्खा भाऊ भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे हे भुताळा- भुताळीण असल्याने त्यांनीच काहीतरी मंत्र- तंत्र, जादूटोणा केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, अशा अंधश्रद्धेतून आरोप भाऊबंदकीतील काही जणांनी केला. त्यातून चिडून त्यांनी भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे यांना जबर मारहाण केली. त्यामुळे भीमा बारकू यांच्या डोक्याला जखम झाली आणि भागीबाई भीमा तेलवडे यांच्या छातीलाही जखम झाली. दोघांनाही जबर मुकामार लागला.

कळमुस्ते गावातील एक तरुण बाळू राऊतमाळे यांनी जखमी अवस्थेत या वृद्ध दांपत्याला हरसुल पोलीस स्टेशनला आणले. अंनिसचे राज्यप्रधान सचिव डॉ. गोराणे यांनी हरसूल पोलिसांशी तातडीने संपर्क केला. वृद्ध दाम्पत्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याबद्दल सुचवले आणि दोषींवर इतर कलमांसहित जादूटोणाविरुद्ध कायद्याचे कलम लावून गुन्हा दाखल करण्याबद्दल विनंती केली. पोलिसांनी या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

सात आठ वर्षांपासून भूताळा- भुताळणी ठरवून त्रास 

सोमवारी अंनिसने तातडीने वृद्ध दांपत्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करून, ग्रामीण पोलीस अधीक्षकांसमोर आणले. जबर मारहाण झालेले वृद्ध दांपत्य आणि त्यांचा मुलगा रवी तेलवडे यांनी सांगितले की, मागील सात आठ वर्षांपासून गावातील काही लोक व भावकीतील काही लोक हे, आई-वडिलांना भूताळा- भुताळणी ठरवून त्रास देत आहेत. त्याबद्दल मागील दोन वर्षांपासून  नाशिक जिल्हाधिकारी, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व हरसुल पोलिसांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून रवि तेलवडे यांनी तक्रार दिलेली आहे. तसेच लेखीस्वरूपात तक्रारी केल्या आहेत. या लोकांवर वेळीच कायदेशीर कारवाई झाली असती तर आजचा हा जीवघेणा प्रसंग उद्भवला नसता, अशी खंत वृद्ध दांपत्य व त्यांचा मुलगा रवी तेलवडे यांनी व्यक्त केली.

अंनिसकडून कारवाईची मागणी

कळमुस्ते येथील तेलवडे कुटुंबाला झालेल्या जबर मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच या घटनेबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जादूटोणाविरुद्ध कलम लावण्यात यावे, असे विनंती पत्र महाराष्ट्र अंनिसच्या वतीने मा.पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) यांना देण्यात आलेले आहे. या विनंती पत्रावर राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे.यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

"एखाद्याला भूताळा -भूताळीण, डाकीण ठरवून अंधश्रद्धा युक्त अवैज्ञानिक, अशास्त्रीय गोष्टींबाबत जबाबदार धरले जाते. त्यातून जबर मारहाण करणे किंवा प्रसंगी जीव घेण्यासारखे प्रसंग उद्भवतात. भुताळी डाकिन ठरवलेल्या व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंब यांना अशावेळी जगणे मुश्किल होते. ते गाव सोडून दुसरीकडे निघून जातात. जर हे कुटुंब गावात राहिले तरी त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवण्याचे इतर लोक टाळतात. ग्रामीण आणि आदिवासी भागात सातत्याने अशा घटना घडतात. त्यासाठी अशा अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन करण्याबरोबरच जादूटोणाविरोधी कायद्याचे पोलिसांसह नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे."
डाॅ. टी.आर.गोराणे
राज्य प्रधान सचिव,
महाराष्ट्र अंनिस

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news