नंदुरबार : दवबिंदू गोठल्याने डाब परिसर बनला हिमाच्छादित

नंदुरबार : दवबिंदू गोठल्याने डाब परिसर बनला हिमाच्छादित
Published on
Updated on

नंदुरबार: योगेंद्र जोशी

मागील वर्षाप्रमाणे यंदाही नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील डाब परिसरात हिमकण जमले असून परिसरातील गवत आणि झाडांची पाने बर्फाच्छादित झाले आहेत. सहा अंश सेल्सिअस पेक्षाही कमी तापमान झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

संपूर्ण खानदेशातील एकमेव ठिकाण असे आढळत असून सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत आहे. डाब येथे मागील पाच वर्षातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी जानेवारी-2017 मध्ये त्यानंतर जानेवारी-2022 मध्ये आणि आता जानेवारी-2023 मध्ये बर्फ जमा होण्याची घटना घडली आहे. नंदुरबार तालुक्यातील कोळपे येथील कृषी विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार दि. 14 जानेवारी 2023 रोजी तापमान प्रचंड घसरले होते 9.3 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान आणि 24.3° सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदवले गेले होते. तोरणमाळ डाब या पट्ट्यात इकडच्या तापमानापेक्षा नेहमी तीन चार अंशाने कमी असते. परिणामी दि. 14 आणि 15 जानेवारीच्या रात्री व पहाटे तापमान सहा अंश पेक्षा घसरले असावे असा अंदाज सांगितला जात आहे.

एरवी रखरखीत तीव्र उन्हासाठी ओळखल्या जाणार्‍या नंदुरबार जिल्यातील दुर्गमभागात चक्क हिम कण जमा झाले. त्या संदर्भाने 'डाब' हे गाव अचानक माध्यमांमधून चर्चेत आले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील अतीदूर्गम भागातील डाब या गावी दि. ९ आणि १० जानेवारी 2022 रोजी थेट ३ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरले होते. दवबिंदुंचे रुपांतर हिमकणात झालेले पहायला मिळाले होते. काही ठिकाणी तर चक्क वाहनांवर, वृक्षवेलींवर, गवतावर आणि भांड्यांमधील पाण्यातही बर्फाचा पातळसा थरही जमा झालेला तेथील लोकांना पहायला मिळाला होता. स्थानिक लोकांनी त्याचे व्हिडिओ आणि अनेक छायाचित्रेही प्रसारित केलेली होती.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे महाराष्ट्रातले थंड हवेचे दुसर्‍या क्रमांकाचे ठिकाण म्हटले जाते. ते याच डोंगर रांगेत आहे. नंदुरबार जिल्ह्यात कमालीची थंडी वाढते त्या-त्यावेळी तोरणमाळ परिसरातही दवबिंदू गोठल्याचे स्थानिक लोकांनी पाहिले आहे. तोरणमाळ हे समुद्रसपाटीपासून उंचावर असून डाब पासून बरेच लांब आहे. परंतु तरीही तुलनेने तोरणमाळपेक्षा डाबचे हवामान उन्हाळ्यातसुध्दा अधिक थंड असते. आताच्या गोठवणाऱ्या थंडीने त्यात भर घातली एवढेच. भारतीय हवामान विभागाचे नंदुरबार येथील तज्ञ सचिन फड यांनी डाबमधील हिमकणांचे शास्त्रीय कारण विषद करतांना सांगितले की, धुळ्यात नुकतीच झालेली गारपीट, नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि त्यासोबतच जोरदार वाहणारे गारठणक वारे या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन डाब परिसरात तापमान घटून अधिक गारठा निर्माण झाला व हिमकण निर्माण झाले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news