पळसदेव सरपंचपदाच्या बैठकांना वेग? राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फायदा भाजपा उचलणार का ? | पुढारी

पळसदेव सरपंचपदाच्या बैठकांना वेग? राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फायदा भाजपा उचलणार का ?

पळसदेव(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : पळसदेव  येथील सरपंचपदाचा कार्यकाळ संपत आला असून, रात्री-अपरात्री सदस्यांना एकत्रित करून आपलीच ठरलेली व्यक्ती सरपंच व्हावी यासाठी सत्ताधार्‍यांमधून प्रयत्न चालले आहेत, तर प्रतिस्पर्ध्यांकडूनही आपल्याकडेच सत्ता पुन्हा कशी येईल यासाठी सदस्यांना एकत्र करून बैठका घेऊन मोट बांधण्यास वेग आला आहे. आगामी काळात पळसदेवच्या सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या पळसदेव ग्रामपंचतीवर नेहमीच तालुक्यातील राजकारण्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. ग्रामपंचायतीचे एकूण 15 सदस्य आहेत. 2021 साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे 8 आणि भाजपाकडे 7 सदस्यसंख्या असल्याने राष्ट्रवादीने ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केली आहे. 7 सदस्यसंख्या घेऊन भाजप विरोधी गटात आहे. ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसीसाठी आरक्षित आहे.

सत्ताधारी काँग्रेस – राष्ट्रवादीकडून पळसदेव येथील जागृत देवस्थान श्री पळसनाथ देवाला साक्षी ठेवून सरपंच व उपसरपंच पद वाटून घेण्यात आले आहे. प्रथम सौ. इंद्रायणी सुजित मोरे या दोन वर्षे सरपंच व सौ. पुष्पलता काळे या एक वर्ष उपसरपंच, नंतर सौ. सोनाली कुचेकर या उपसरपंच झाल्या;

परंतु उपसरपंच सौ. सोनाली कुचेकर यांनी अंतर्गत गटबाजीमुळे नाराजीतून मुदत संपण्याच्या चार महिने आधीच राजीनामा दिला. त्यानंतर कैलास भोसले हे उपसरपंचपदी विराजमान झाले. आता सरपंच सौ. इंद्रायणी सुजित मोरे यांची मुदत संपल्याने त्या केव्हाही राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहेत. मात्र, गावातील अंतर्गत गटबाजीमुळे कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी रात्री-अपरात्री बेठका घेऊन चाचपणी सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, आजच्या संभाव्य सरपंचपदाचे तीन जणांच्या गटामध्ये सरपंचपदाची क्रमवारी ठरत नसल्याने व युवा सदस्य मअभी नही तो कभी नहीफ या भूमिकेत असल्यामुळे पुढे काय होणार आहे ते पाहावे लागेल. विरोधी भाजपा गट मात्र सावध भूमिका घेत सत्ताधार्‍यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.

Back to top button