कौतुकास्पद! दिव्यांग तरुणांनी केले कळसूबाई शिखर सर; जांबूतच्या दोन युवकांची यशस्वी चढाई | पुढारी

कौतुकास्पद! दिव्यांग तरुणांनी केले कळसूबाई शिखर सर; जांबूतच्या दोन युवकांची यशस्वी चढाई

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा : जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जांबूत (ता. शिरूर) येथील दौलत गाजरे आणि मच्छिंद्र थोरात या दोन दिव्यांग तरुणांनी नुकतेच महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील सर्वांत उंच कळसूबाई शिखर यशस्वीपणे सर केले. इच्छा असेल, तर मार्ग दिसेल, हे या दोन युवकांनी सिद्ध केले आहे. हातात काठीच्या आधारावर चालणार्‍या या दोन्ही युवकांच्या या धाडस व जिद्दीमुळे ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

दौलत गाजरे हे जांबूत (ता. शिरूर) येथे कोतवाल म्हणून काम करत आहेत, तर मच्छिंद्र थोरात हे आपले सरकार सेवा केंद्र चालवत आहेत. इंग्रजी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर त्यांचे मित्र भागीनाथ झिंजाड व इतर सहकारी नेहमी किल्ले ट्रेकिंगला जात असतात. अशातच आपण मनात ठरविले तर या शिखरावर पोहचू शकतो, अशी खुणगाठ मनाने बांधून हे दोन्ही तरुण कळसूबाई शिखराच्या चढाईला लागले. त्यांचे धैर्य व जिद्द पाहून अनेकांना याचे कुतूहल निर्माण झाले होते. अनेकदा अनुभवी ट्रेकर्सना शिखर चढताना दम लागतो. मात्र, दौलत गाजरे आणि मच्छिंद्र थोरात या दिव्यांग तरुणांनी प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाने आपले ठरविलेले ध्येय कळसूबाई शिखर सर केले.

त्यांच्या या धाडसाबद्दल पीएमआरडीएचे उपायुक्त रामदास जगताप, तहसीलदार प्रशांत पिसाळ, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, मंडलाधिकारी एकनाथ ढाके, तलाठी अमोल ठिगळे, जी. आर. घोडके, जे. डी. धुरंधर, ग्रामसेवक श्रीकांत वाव्हळ, सरपंच दत्तात्रय जोरी, शिरूर तालुक्यातील सर्व कोतवाल बांधव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांबूत यांनी अभिनंदन केले.

Back to top button