Nanded News| नांदेड हळहळले: इमामवाडी येथे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने जीवन संपविले
कंधार: पुढारी वृत्तसेवा : पतीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर पत्नीनेही विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविले. ही ह्रदयद्रावक घटना इमामवाडी (कंधार) येथे आज (दि.१५) सकाळी ११ च्या सुमारास घडली. रामदास सोपान करेवाड (वय ३५), वर्षा रामदास करेवाड (वय ३०) असे मृत पतीपत्नीचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Nanded News
याबाबत अधिक माहिती अशी की, इमामवाडी येथील रामदास करेवाड यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून जीवन संपविले. या घटनेची माहिती पत्नी वर्षा हिला कळताच तिने विहिरीत उडी घेऊन आपलेही जीवन संपविले. मृत दाम्पत्याच्या पश्चात मुलगा, मुलगी असे अपत्य आहेत. Nanded News
कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार शिवाजी सानप, बापूराव व्यवहारे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह कंधार ग्रामीण रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
मृत रामदास यांचे चुलत भाऊ संतोष प्रभाकर करेवाड (रा. इमामवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. कंधार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शिवाजी सानप करत आहेत.
हेही वाचा

